पदक मिळविण्याची संधी कमी असल्याचे कारण देत भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतील फुटबॉल व टेबल टेनिसमधून माघार घेण्याचा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
प्राधिकरणाचे सरसंचालक जिजी थॉमसन यांनी सांगितले की, या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंना शासकीय खर्चाने पाठविले जाणार आहे. त्यामुळेच ज्या खेळांमध्ये पदक मिळविण्याची संधी नाही, अशा क्रीडा प्रकारात भारताने भाग घेऊ नये असा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी गुआंगझुओ येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने ९३५ खेळाडू व अधिकाऱ्यांचे पथक पाठविले होते. मात्र एवढे मोठे पथक पाठविणे खर्चिक असल्यामुळेच केवळ पदक मिळविण्याची संधी असलेल्या खेळांमध्येच भाग घेण्याचा निर्णय घेतला जात आहे. यंदा ६२५ सदस्यांचे पथक पाठविले जाणार आहे. बेसबॉल, बाउलिंग, तलवारबाजी, कराटे, मॉडर्न पेन्टॅथलॉन, रग्बी, सॉफ्टबॉल, सॉफ्ट टेनिस, ट्रायथलॉन या खेळांमध्ये आम्ही प्रवेशिका पाठविणार नाही. क्रिकेटमध्ये पदकाची संधी असली तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रवेशिका पाठविण्यास विरोध केला आहे. त्याचप्रमाणे टेबल टेनिस, फुटबॉल व हँडबॉलमध्येही आमचा सहभाग राहणार नाही. मात्र या खेळांबाबत अंतिम निर्णय केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून घेतला जाणार आहे.
आगामी आशियाई स्पर्धेसाठी भारताला संयुक्त अरब अमिराती व जॉर्डन यांचा समावेश असलेल्या साखळी गटात स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटातील दोनच संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार असल्यामुळे भारताला बाद फेरीच्या आशा नाहीत. टेबल टेनिसमध्येही चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर, जपान यांचा सहभाग असल्यामुळे त्यांच्यासमोर भारताचा निभाव लागणार नाही हे लक्षात घेऊनच भारताचा संघ पाठवू नये अशी शिफारस आम्ही केली आहे, असे थॉमसन म्हणाले.