संघातील अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीमुळे कामगिरी सुधारण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने व्यक्त केला.
३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान मितालीने सांगितले की, ‘‘आमच्या संघात झुलन गोस्वामी, अमिता शर्मा, हरमनप्रीत कौर यांसारख्या अनुभवी खेळाडू आहेत. थिरुश कामिनी आणि करुणा जैन यांनी संघात पुनरागमन केले आहे. त्यांनी गेल्या विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. भारतीय संघ समतोल आहे. चांगल्या कामगिरीसाठी याची मदत होईल. क्रिकेट चाहत्यांना प्रत्येक सामन्यात ३०० धावा व्हाव्यात असे वाटते, म्हणूनच फलंदाजांना साहाय्यकारी खेळपटय़ा निर्माण करायला हव्यात.’’