एच. एस. प्रणॉयने इंडोनेशिया मास्टर्स ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदासह कारकिर्दीतील पहिल्यावहिल्या जेतेपदाची कमाई केली. आंतरराष्ट्रीय स्वरुपाच्या स्पर्धामध्ये पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत यांच्यापाठोपाठ प्रणॉयने भारताचा झेंडा रोवला.
गोपीचंद अकादमीचा विद्यार्थी असलेल्या प्रणॉयने अंतिम लढतीत इंडोनेशियाच्या फिरमान अब्दुल खोलिकवर २१-११, २२-२० अशी मात केली. २२ वर्षीय प्रणॉयने पहिल्या गेममध्ये ६-२ अशी आघाडी केली. ही आघाडी सातत्याने वाढवत सलग पाच गुणांच्या कमाईसह पहिला गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये फिरमानने ६-६ अशी बरोबरी नंतर ९-७ अशी अल्प आघाडी मिळवली. त्यानंतर प्रत्येक गुणासाठी जोरदार मुकाबला रंगला. २०-२० स्थितीता प्रणॉयने मॅचपॉइंट गुण मिळवत दुसऱ्या सेटसह सामन्यावर कब्जा केला.
या विजयाने प्रचंड आनंद झाला आहे. ग्रां.प्रि. स्पर्धा जिंकेन असे कधीच वाटले नव्हते. व्हिएतनाम स्पर्धेतल्या पराभवाने मी निराश झालो होतो. अंतिम लढतीपूर्वी थोडासा दडपणाखाली होतो, मात्र सर्वोत्तम खेळ केल्यानेच विजय मिळाला.
-एच. एस. प्रणॉय