ब्रूस ली, जॅकी चॅन यांच्या चित्रपटांनी मार्शल आर्ट क्रीडाप्रकारला जगात लोकप्रियता मिळवून दिली. आता बॉलीवूडपटांमध्येही मार्शल आर्टच्या थरारक हाणामाऱ्या पाहून स्तब्ध व्हायला होते. या कलाकारांना मार्शल आर्ट शिकवणारे दिग्गज लवासातर्फे आयोजित मार्शल आर्ट महोत्सवानिमित्ताने एकाच व्यासपीठावर आले आणि त्यांची प्रात्यक्षिके पाहून सर्वच मंत्रमुग्ध झाले. शाओलिन कुंग-फू, मुआय थाय, थाईंग शाओलिन वुशू या क्रीडा प्रकारांनी नटलेल्या मार्शल आर्टची प्रात्यक्षिके पाहून सर्वानी तोंडात बोटे घातली. महोत्सवात सहभागी झालेल्या लहान मुलांनीही प्रात्यक्षिके सादर करून सर्वाची मने जिंकली.
क्रीडाक्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या लवासातर्फे मुलांना मार्शल आर्टचे अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी ‘चिताह जेकेडी लवासा’ ही मार्शल आर्ट अकादमी स्थापन करण्यात आली आहे. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात सहा देशांमधील दिग्गजांनी मुलांना मार्शल आर्टचे धडे गिरवले. या महोत्सवात महाराष्ट्रासह मणिपूर, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, हरयाणा तसेच पंजाब या राज्यांमधील खेळाडूंनी भाग घेतला होता.
अफगाणिस्तानचा मार्शल आर्टमधील दिग्गज आणि ‘क्रिश-३’ चित्रपटात अंतमॅनची भूमिका निभावलेला समीर अली खान म्हणाला, ‘‘मी जन्मल्यापासूनच अफगाणिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीशी दोन हात करत आहे. कायम तणावग्रस्त असलेल्या अफगाणिस्तानमध्ये मार्शल आर्ट हा क्रीडाप्रकार फारच लोकप्रिय आहे. स्वसंरक्षण करता यावे, म्हणूनच मी मार्शल आर्टकडे वळलो. भारतातही गुणवत्ता बरीच आहे. त्यामुळे इतरांपासून बचाव करण्याकरिता आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्यासाठी लहान मुलांनी मार्शल-आर्ट शिकावे.’’
‘‘सध्या जगातील ८० टक्के लोक हे औषधांच्या आधारे जगत आहेत. मार्शल आर्टमधील शाओलिन कुंग फूसारख्या क्रीडा प्रकारामुळे शरीरात उर्जा कशी निर्माण करायची आणि स्वत:चे शरीर कसे निरोगी राखावे, हे शिकता येते. २५ वर्षांत मी कधीही आजारी पडलो नाही,’’ असे शाओलिन कुंग फूमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या नेपाळच्या सारू वीरजी याने सांगितले. लवासात येत्या काही महिन्यांत रोइंग, हॉकी आणि बॅडमिंटन या खेळांसाठीही अकादमी उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी हॉकी ऑस्ट्रेलिया आणि प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीशी करार करण्यात येणार असल्याचे लवासा कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष नॅथन अँड्रय़ूज यांनी सांगितले.