मजल दरमजल करीत इंग्लंडच्या खात्यावर आता तब्बल २३७ धावांची आघाडी जमा आहे आणि अद्याप त्यांच्या पहिल्या डावापुढेसुद्धा पूर्णविराम मिळालेला नाही. दुसरा दिवस संपल्याचा हा स्वल्पविरामच आगामी धोक्याची चाहूल देणारा आहे. कारण इंग्लंडच्या आघाडीचा डोंगर पार करून पुन्हा धावसंख्या रचता आली नाही तर डावाने पराभव अटळ आणि आघाडी ओलांडली तरी दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी उतरणाऱ्या इंग्लंडपुढे भारत किती मोठे आव्हान देणार, हा प्रश्नचिन्हच. एकंदर ‘अब तुम्हारे हवाले इज्जत साथीयों..’ अशी केविलवाणी साद भारतीय संघाला घालण्याशिवाय क्रिकेटरसिकांपुढे पर्याय नाही.
पाचव्या आणि अखेरच्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक, गॅरी बॅलन्स आणि जो रूट यांच्या अर्धशतकांच्या बळावर ७ बाद ३८५ अशी पहिल्या डावात समर्थपणे मजल मारली आहे. चिवट फलंदाजी करणारा रूट शतकापासून आठ धावांच्या अंतरावर आहे. त्याने १२९ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकारांसह आपली महत्त्वपूर्ण खेळी साकारली आहे.
सकाळच्या सत्रात वरुण आरोनने सॅम रॉबसनला (३७) लवकर बाद करून दिवसाची छान सुरुवात केली. परंतु कुकने फॉर्मात असलेल्या बॅलन्ससोबत दुसऱ्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. आरोननेच कुकला बाद करून ही जोडी फोडली. कुकने १८३ चेंडूंत ९ चौकारांसह ७९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. मग अश्विनने बॅलन्सचा (६४) अडसर दूर केला. मग अनुभवी इशांत शर्माने इयान बेलला खेळपट्टीवर टिकू दिले नाही, तर अश्विनने मोइन अलीचा त्रिफळा उडवला. त्यामुळे १ बाद १९१ वरून इंग्लंडचा डाव ५ बाद २२९ असा गडगडला. त्यानंतर रूटने बटलरसोबत सहाव्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करून संघाची आघाडी वाढवण्यात मोलाचा वाटा उचलला. भारताकडून इशांत शर्मा, वरुण आरोन आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
धावफलक
भारत (पहिला डाव) : १४८.
इंग्लंड (पहिला डाव) : अ‍ॅलिस्टर कुक झे. विजय गो. आरोन ७९, सॅम रॉबसन त्रिफळा गो. आरोन ३७, गॅरी बॅलन्स झे. पुजारा गो. बॅलन्स ६४, इयान बेल झे. धोनी गो. शर्मा ७, जो रूट खेळत आहे ९२, मोइन अली त्रिफळा गो. अश्विन १४, जोस बटलर झे. अश्विन गो. शर्मा ४५, ख्रिस वोक्स झे. धोनी गो. कुमार ०, ख्रिस जॉर्डन खेळत आहे १९, अवांतर (बाइज १४, लेगबाइज ३, वाइड १, नोबॉल १०) २८, एकूण १०५ षटकांत ७ बाद ३८५.
बाद क्रम : १-६६, २-१९१, ३-२०१, ४-२०४, ५-२२९, ६-३०९, ७-३१८
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार २४-३-८६-१, इशांत शर्मा २४-८-५८-२, वरुण आरोन २५-१-१११-२, स्टुअर्ट बिन्नी १२-०-५८-०, आर. अश्विन २०-२-५५-२.