अजिंक्य रहाणेचे दमदार शतक आणि आर. अश्विनची प्रभावी फिरकीच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटीवर मजबूत पकड बनवली आहे. त्यामुळे श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकाराला पराभवाने कारकीर्दीचा शेवट करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र श्रीलंकेचे खेळाडू संगकाराला विजयी निरोपासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यास कोणतीच कसर सोडणार नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटीचा पाचवा दिवशी हा संघर्षांचा असेल हे नक्की.
१ बाद ७० धावांवरून चौथ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या भारताने रहाणेच्या १२६ धावांच्या संयमी खेळीच्या जोरावर ८ बाद ३२५ धावांवर डाव घोषित केला. पहिल्या डावात ८७ धावांनी आघाडीवर असलेल्या भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी ४१३ धावांचे लक्ष्य ठेवले. त्या उत्तरात उतरलेल्या श्रीलंकेला अवघ्या ७२ धावांत दोन महत्त्वाचे फलंदाज गमवावे लागले आणि त्यामध्ये संगकाराचाही समावेश होता. अश्विनने सलग चार डावांमध्ये संगकाराला बाद केल्यामुळे त्याच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसली.दुसऱ्या डावात भारताचा सलामीवर लोकेश राहुल स्वत:त बाद झाल्यानंतर मुरली विजय आणि रहाणे यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारी केली. त्यांच्या या भागीदारीमुळे भारताने मोठय़ा आव्हानाच्या दिशेने पाऊल टाकले. मात्र विजय (८२) बाद होताच भारताच्या डावाला घरघर लागली. रोहित शर्मा (३४) वगळता विराट कोहली, स्टुअर्ट बिन्नी, वृद्धिमान साहा, आर. अश्विन आणि अमित मिश्रा यांना मोठी खेळी करण्यास अपयश आले. रहाणेने अप्रतिम खेळ करताना कारकीर्दीतील चौथे कसोटी शतक झळकावले. रहाणेने २४३ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने १२६ धावा केल्या. ८ बाद ३२५ धावांवर कोहलीने डाव घोषित करून यजमानांसमोर ४१३ धावांचे लक्ष्य ठेवले.खेळपट्टीचा अचूक अंदाज घेत कोहलीने पहिले षटक टाकण्यासाठी अश्विनला पाचारण केले. त्याच्या या खेळीने श्रीलंकेवर दडपण जाणवत होते. तिसऱ्याच षटकात त्याचा परिणाम दिसला आणि कौशल सिल्वा अश्विनच्या गोलंदाजीवर बिन्नीच्या हातात झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर संगकारा मैदानावर येताच त्याला गार्ड ऑफ ऑनर देऊन त्याचे स्वागत करण्यात आले. अखेरच्या कसोटीत संगकारा चिवट खेळ करेल असे वाटत असताना अश्विनने त्याच्या चाहत्यांची निराशा केली. नवव्या षटकात अश्विनने पुन्हा संगकाराला फिरकीच्या जाळ्यात ओढले आणि गलीमध्ये उभ्या असलेल्या मुरली विजयने झेल टिपून त्याला माघारी धाडले. तंबूत जात असताना भारतीय खेळाडूंनी संगकाराशी हस्तांदोलन करून त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या कडकडात त्याला निरोप दिला.

धावफलक

भारत (पहिला डाव) : ३९३

श्रीलंका (पहिला डाव) : ३०६

भारत (दुसरा डाव) : मुरली विजय पायचीत गो. थरिंदू कौशल ८२, लोकेश राहुल त्रि. गो. धम्मिका प्रसाद २, अजिंक्य रहाणे झे. दिनेश चंडिमल गो. थरिंदू कौशल १२६, विराट कोहली पायचीत गो. थरिंदू कौशल १०, रोहित शर्मा झे. जेहान मुबारक गो. थरिंदू कौशल ३४, स्टुअर्ट बिन्नी झे. लाहिरू थिरीमाने गो. धम्मिका प्रसाद १७, वृद्धिमान साहा नाबाद १३, आर. अश्विन झे. दिनेश चंडिमल गो. धम्मिका प्रसाद १९, अमित मिश्रा झे. जेहान मुबारक गो. धम्मिका प्रसाद १०, उमेश यादव नाबाद ४. अवांतर – ८; एकूण – ८ बाद ३२५ (डाव घोषित)

गोलंदाज : धम्मिका प्रसाद १५-०-४३-४, रंगना हेराथ २९-४-९६-०, दुशमंथा चमिरा १४-०-६३-०, थरींदू कौशल ३१-१-११८-४.

श्रीलंका (दुसरा डाव) :

कौशल सिल्वा झे. स्टुअर्ट बिन्नी गो. आर. अश्विन १़, दिमुथ करुणारत्ने नाबाद २५, कुमार संगकारा झे. मुरली विजय गो. आर. अश्विन १८, अँजेलो मॅथ्युज नाबाद २३. अवांतर – ५; एकूण – २ बाद ७२; गोलंदाज : आर. अश्विन १०-५-२७-२, उमेश यादव २-०-१०-०, इशांत शर्मा ४-०-१८-०, अमित मिश्रा ५-१-१३-०.