भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक निकोलाय अ‍ॅडम यांचे मत

भारताच्या युवा फुटबॉलपटूंची प्रगती खूप समाधानकारक आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने सोळा वर्षांखालील खेळाडूंसाठी आयोजित केलेल्या चाचणीतून मी हा निष्कर्ष काढला आहे, असे भारताच्या सतरा वर्षांखालील फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक निकोलाय अ‍ॅडम यांनी सांगितले.

भारतात पुढील वर्षी सतरा वर्षांखालील गटाची विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी संभाव्य खेळाडूंची निवड करण्यासाठी महासंघातर्फे नुकतीच चाचणी घेण्यात आली होती. भारतीय वरिष्ठ संघाचे माजी कर्णधार अभिषेक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही चाचणी झाली. त्यामधून सध्या चार खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

निकोलाय यांनी सांगितले, निवडलेल्या चार खेळाडूंचा दर्जा चांगला आहे. अर्थात या खेळाडूंनी आपली सतरा वर्षांखालील संघात निवड झाली आहे असे मानू नये. कारण या स्पर्धेसाठी अजून भरपूर अवधी बाकी आहे. एक मात्र नक्की भारताच्या युवा खेळाडूंच्या कामगिरीत पुष्कळ सुधारणा झाली आहे. अन्य ठिकाणीही विविध स्पर्धाना मी भेटी देत असून तेथील खेळाडूंच्याही कामगिरीचे मी बारकाईने निरीक्षण करीत आहे. युवा खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी मिळाली पाहिजे.