इंडोनेशियन स्पध्रेतील विजेतेपदाला चौथ्यांदा गवसणी घालून आत्मविश्वासाने ऑलिम्पिक स्पध्रेत सहभागी होण्याचे भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे स्वप्न भंगले आहे. वर्षभर जेतेपदाच्या दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या सायनाला या स्पध्रेतही जिंकता आलेले नाही. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मारिनच्या झंझावाती खेळापुढे उपांत्यपूर्व फेरीत सायनाने हार पत्करली.
नऊ लाख डॉलर पारितोषिक रकमेच्या इंडोनेशिया सुपर सीरिज प्रीमियर बॅडिमटन स्पध्रेतील महिला एकेरीत शुक्रवारी कॅरोलिनाने सायनाला ४७ मिनिटांत २४-२२, २१-११ अशा फरकाने हरवले. ऑल इंग्लंड आणि विश्व अजिंक्यपद स्पध्रेतही सायनाला कॅरोलिनानेच हरवले होते.
पहिल्या गेममध्ये आठवी मानांकित सायना ७-१३ अशी पिछाडीवर होती. मात्र त्यानंतर तिने झुंजार खेळाचे प्रदर्शन करीत १६-१४ अशी आघाडी घेतली, मग ती १९-१६ अशी वाढवत गेम जिंकण्याच्या दिशेने वाटचाल केली. मात्र त्यानंतर कॅरोलिनाने दिमाखदार खेळ करीत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र कॅरोलिनाचाच एकछत्री अंमल दिसून आला आणि हैदराबादच्या २५ वर्षीय सायनाचे आव्हान संपुष्टात आले.