फिफा फुटबॉल विश्वचषकाची आता अखेरच्या सामन्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. शनिवारी होणाऱ्या ब्राझील-नेदरलँड्स यांच्यातील सामन्यापेक्षा जर्मनी-अर्जेटिना यांच्यातील अंतिम सामन्याकडे सट्टेबाजांचे अधिक लक्ष आहे. रविवार हा सट्टेबाजांसाठी सर्वात मोठा दिवस आहे. जर्मनीचा थॉमस म्युलर आणि अर्जेटिनाचा लिओनेल मेस्सी यांच्यासाठी सट्टेबाजांनी चांगला भाव देऊ केला आहे. सर्वाधिक गोलकर्ता म्हणून अजूनही कोलंबियाच्या जेम्स रॉड्रिगेझलाच भाव असला तरी आता त्या यादीत म्युलरचाही समावेश झाला आहे. अंतिम सामन्यानंतर म्युलर सर्वाधिक गोलकर्ता ठरेल, असा सट्टेबाजांचा होरा आहे. अंतिम सामन्यासाठी सट्टेबाजांची जर्मनीलाच पसंती आहे. अंतिम सामना कोण जिंकेल, यासाठी तसेच सामन्यावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा राहील, पहिल्या ४५ मिनिटांत किती व कोण गोल करेल तसेच ९० मिनिटांत सामना अनिर्णीत राहील का, आदी किती तरी बाबींवर सट्टा लावला जात आहे. पंटर्सनी जर्मनीलाच सर्वाधिक पसंती दिली आहे. अर्जेटिना चमत्कार करेल, असे वाटणारे पंटर्स फारच थोडे असल्याचे एका सट्टेबाजाने सांगितले. ब्राझील आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्यासाठी आता सट्टेबाजांनी समान भाव देऊ केला आहे.  
आजचा भाव :
ब्राझील                  नेदरलँड्स
९० पैसे (९/१०)      ९० पैसे (९/१०)


ती आली, तिने पाहिले आणि..
बेल्जियमच्या संघाला फिफा विश्वचषक स्पर्धेत मोठी झेप घेता आली नसली तरी बेल्जियमच्या एका चाहतीला मात्र या विश्वचषकाने बरेच काही मिळवून दिले. आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी जगभरातील चाहते ब्राझीलमध्ये दाखल झाले आहेत. अॅक्सेले डेस्पीगेलायरे ही १७ वर्षीय चाहती रशियाविरुद्धच्या सामन्यात बेल्जियमला ‘चिअर-अप’ करण्यासाठी साओ पावलोमधील ऐतिहासिक अशा इस्टाडियो मॅराकाना स्टेडियमवर उपस्थित होती. या सामन्यादरम्यान पाठिंबा देत असतानाची तिची छायाचित्रे जगभरातील वृत्तपत्रांमध्ये झळकल्यानंतर अॅक्सेलेच्या कारकिर्दीला नवी झळाळी मिळाली. तिला ‘लॉरियल’ या सौंदर्यप्रसाधने बनवणाऱ्या लोकप्रिय कंपनीने जाहिरातीसाठी ऑफर दिली. अॅक्लेसे हिने हा प्रस्ताव स्वीकारला आहे. अॅक्सेले हिने स्वत:चे व्यावसायिक फेसबुक पेज सज्ज केले असून त्याला आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त ‘लाईक्स’ मिळाल्या आहेत.


चीनमध्येही फुटबॉल फिव्हर..
ब्राझीलमध्ये चालू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पध्रेत चीनचा संघ नाही, परंतु तरीही या देशात फुटबॉलचा ज्वर तीव्रपणे जाणवत आहे. बीजिंगमध्ये एका इंटरनेटवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या प्रसारासाठी या मंडळींनीही फुटबॉलचाच आधार घेतला. सदर छायाचित्रात चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि जर्मनी संघाच्या जर्सीसह विश्वचषक घेऊन छायाचित्रे काढून घेणाऱ्या तरुणी दिसत आहेत.