पद्मिनी राऊत, युवा बुद्बिबळपटू
बुद्धिबळात करिअर करताना वयाची मर्यादा कधी आड येत नाही. मला महिलांच्या गटात विश्वविजेतेपद मिळवायचे आहे, हा आत्मविश्वास ओडिशाची उदयोन्मुख खेळाडू पद्मिनी राऊत हिने व्यक्त केला आहे. पद्मिनीला येथील जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत पदकाला गवसणी घालता आली नाही. मात्र तिने १३ फेऱ्यांमध्ये नऊ गुण मिळवीत उल्लेखनीय कामगिरी केली. भुवनेश्वर येथे राहणाऱ्या २० वर्षीय पद्मिनीने आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविले आहे. तिने नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळविले होते. आपल्या कारकिर्दीबाबत पद्मिनीने केलेली खास बातचीत-
* कनिष्ठ जागतिक स्पर्धेत तुला अपेक्षेइतके यश मिळाले नाही असे तुला वाटते का?
होय, पदक मिळविण्याबाबत मी खूप आशावादी होते. मात्र एक-दोन फेऱ्यांमध्ये मला अपेक्षेइतका विजय मिळविता आला नाही. दोन-तीन डावांमध्ये मला बरोबरी साधता आली नाही, अन्यथा मी पहिल्या तीन क्रमांकांमध्ये पोहोचू शकले असते.
* भारतात ही स्पर्धा असल्यामुळे दडपण होते काय?
तसे म्हणता येणार नाही. स्पर्धा कोठेही असली मी शंभर टक्के कामगिरी करण्याचा प्रयत्न करीत असते. खरे तर भारतात ही स्पर्धा होती, त्यामुळे एरवी परदेशात जाण्यासाठी करावा लागणारा प्रवास येथे टाळता आला. त्याचा मानसिक फायदाच आम्हा भारतीय खेळाडूंना मिळाला. पदक मिळविता आले नाही, तरीही माझी कामगिरी समाधानकारक आहे.
* या खेळात कारकीर्द करताना तुझे मुख्य ध्येय कोणते आहे?
जेव्हा मी या खेळात कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ज्युडिथ पोल्गर हिच्याप्रमाणेच जागतिक स्तरावर सर्वोच्च यश मिळविण्याचेच माझे ध्येय आहे. मला माहीत आहे की, हे ध्येय साकार करण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागणार व बरीच वर्षे वाट पाहावी लागणार आहे. मात्र त्यासाठी मी खूप मानसिक तयारी केली आहे. माझ्या आई-वडिलांचेही त्यासाठी संपूर्ण सहकार्य मिळत आहे आणि मिळणार आहे.
* घरची बुद्धिबळाची पाश्र्वभूमी नसतानाही आतापर्यंत तुला हे यश कसे मिळाले?
माझे वडील प्राध्यापक आहेत, मात्र हौस म्हणून ते बुद्धिबळ खेळत असत. त्यांनीच मला या खेळात करिअर करण्याचा सल्ला दिला. त्या वेळी मी १२ वर्षांची होते. मला या खेळात कोणीही गुरू नाही. मी हा खेळ सुरू केला त्या वेळी आमच्या राज्यात अकादमी नव्हती. आता काही ठिकाणी अकादमी सुरू झाल्या आहेत. मात्र नियमित सराव हाच खरा गुरू असतो, हे तत्त्व डोळ्यांसमोर ठेवत मी आजपर्यंत वाटचाल केली आहे. दररोज सहा ते सात तास मी सराव करते. इंटरनेटद्वारा विविध डावांचा सखोल अभ्यास करीत मी त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करते.
ल्ल राज्य शासन व राज्य संघटनेकडून कितपत सहकार्य मिळते?
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये पदक मिळविल्यानंतर रोख पारितोषिक मिळते. भारतीय हवाई प्राधिकरणाकडून मला एक वर्षांसाठी करारबद्ध करण्यात आले असून हा करार वाढवण्याची मला खात्री आहे.
* पुण्यातील राष्ट्रीय बुद्धिबळ लीगचा तुला कितपत फायदा झाला?
या लीगमुळे मला खूप फायदा झाला. अनेक तुल्यबळ व बलाढय़ खेळाडूंबरोबर डाव खेळण्याची मला संधी मिळाली. त्यामुळे मला बरेच काही शिकावयास मिळाले. अशा लीग भारतात अनेक ठिकाणी आयोजित करण्याची आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील लीग स्पर्धाही आपल्या देशात झाल्या, तर भारतीय खेळाडूंना त्याचा फायदा होईल.
* तुला कोणते डावपेच अधिक आवडतात?
आक्रमक खेळ करणे, हेच माझे मुख्य तत्त्व असते. तरीही प्रतिस्पर्धी खेळाडूने केलेली व्यूहरचना पाहूनच मी त्याप्रमाणे डावात रणनीती वापरते. डावाच्या मध्यावर जाऊन आक्रमण करणे मला खूप आवडते. डावाच्या शेवटी महत्त्वपूर्ण चाली करण्याबाबत मी थोडीशी कमकुवत आहे. त्यावर मी आता एकाग्रतेने सरावात भर देणार आहे.