चॅम्पियन्स टेनिस लीग आणि इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग अशा टेनिससंदर्भात दोन लीग सुरू झाल्या आहेत. मात्र भारतीय टेनिसपटू आणि भारतीय टेनिस यांचा विकास हे चॅम्पियन्स टेनिस लीगचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच या लीगला भारतीय टेनिस लीग म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे मत ज्येष्ठ माजी टेनिसपटू विजय अमृतराज यांनी व्यक्त केले. चॅम्पियन्स टेनिस लीगचा दुसरा हंगाम काही दिवसांतच सुरू होत आहे. त्यानिमित्ताने लीग, संरचना, आर्थिक प्रारूप याविषयी अमृतराज यांच्याशी केलेली बातचीत.

’इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर बहुतांशी खेळांमध्ये फ्रँचाइज आधारित लीग सुरू झाल्या आहेत. टेनिसमध्ये तर एकाच वेळी दोन लीग आहेत. परस्परपूरक ठरण्याऐवजी दोन्ही लीग एकमेकांचे प्रतिस्पर्धी होण्याची शक्यता वाटते?

एकाच खेळाच्या दोन लीग आहेत ही सत्यस्थिती आहे, मात्र एकमेकांच्या स्पर्धक नाहीत. आयपीटीएल जागतिक क्रमवारीत अव्वल वीसमध्ये असलेल्या खेळाडूंसाठी आहे. दिल्लीसह दुबई, सिंगापूर, मनिला अशा परदेशातील शहरांचे संघ आहेत. भारतीय खेळाडूंना मिळणाऱ्या संधी मर्यादित आहेत. चॅम्पियन्स टेनिस लीग स्पर्धेत भारतीय शहरांचे संघ आहेत. भारताच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळावी हा हेतू आहे. त्यामुळे या लीगचे वर्णन भारतीय टेनिस लीग करणे योग्य होईल. या लीगमध्ये सर्व खेळाडू सगळे सामने खेळतात आणि व्यावसायिक पद्धतीने सामन्यांचे आयोजन होते.

’बहुतांशी लीग स्पर्धाचे आर्थिक समीकरण ढासळले आहे आणि त्यामुळेच आयोजनावर विपरीत परिणाम झाला आहे. आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी काय उपाययोजना आहेत?

लीगच्या निर्मितीआधीपासून आर्थिक समीकरणांवर सखोल अभ्यास केला. सुरुवातीची तीन वर्षे नफ्याचे गणित राखणे कठीण आहे. याची कल्पना आम्ही फ्रँचाइजींना दिली होती. स्टेडियम्स, खेळाडूंचा निवास आणि प्रवासाची व्यवस्था, चेंडू अशा आवश्यक गोष्टींवर खर्च करणे आवश्यक आहे. अनाठायी खर्च टाळण्याचा प्रयत्न करत आहोत. पहिल्या हंगामानंतर काही फ्रँचाइजींनी लीग सोडण्याचा निर्णय घेतला. यात वावगे काहीच नाही. त्यांच्याशी आजही उत्तम संबंध आहेत. मात्र पुणे फ्रँचाइजींशी वाद झाला. दुसऱ्या हंगामात त्यांना दूर ठेवण्याचा निर्णय घेतला.

’पहिल्या हंगामात लिएण्डर पेस तुमच्या लीगमध्ये खेळला होता. दुसऱ्या हंगामात तो खेळणार नाही. त्याऐवजी त्याने आयपीटीएलला प्राधान्य दिले आहे. त्याचा सहभाग लीगसाठी उपयुक्त ठरला असता?

निश्चितच. पहिल्या हंगामात त्याचा अनुभव युवा खेळाडूंसाठी फायदेशीर ठरला होता. दुसऱ्या हंगामातही त्याने खेळावे यासाठी प्रयत्न करण्यात आले. सहभागी होण्याचा निर्णय वैयक्तिक आहे. त्याबाबत आग्रह किंवा सक्ती करता येत नाही. प्रत्येक फ्रँचाइजीला गेल्या वर्षीच्या संघातील खेळाडूंना कायम ठेवण्याची संधी देण्यात आली होती. हैदराबाद संघाने मार्टिना हिंगिसला आपल्या ताफ्यातच कायम ठेवले. पेसबाबत तसे झाले नाही. पेसचे भारतीय टेनिसला योगदान अतुलनीय आहे. लीगमध्ये त्याचा सहभाग युवा खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण अनुभव ठरला असता, पण त्याच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो.

’नव्या हंगामात नागपूर शहराचा संघ असणार आहे. क्रिकेटच्या आयोजनासाठी प्रसिद्ध या शहराच्या संघाला समाविष्ट करून घेताना तुमची भूमिका काय?

मेट्रो शहरे सोडून छोटय़ा शहरांमध्ये टेनिसचा प्रचार व्हावा, तिथल्या नागरिकांना दर्जेदार टेनिस पाहण्याची संधी मिळावी, हा विचार होता. सुदैवाने नागपूरमध्ये शहरातच मैदानाची व्यवस्था आहे. स्थानिक संघटना आणि सरकार यांचा प्रतिसाद हुरूप वाढवणारा आहे.

’दुसऱ्या हंगामात सामने आकर्षक व्हावेत यासाठी काही बदल करण्यात आले आहेत का?

पहिल्या हंगामानंतर खेळाडू, प्रेक्षक, फ्रँचाइजी यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांच्याकडून सूचना मागवल्या. त्यानुसार काही बदल करण्यात आले आहेत. प्रत्येक सेट ५ गुणांचा असेल. ४-४ स्थितीनंतर टायब्रेकर सुरू होईल. रोज केवळ एकच सामना असेल. संध्याकाळी सात वाजता सुरू होणारी लढत दहाच्या आत संपेल. चाहत्यांना सामना संपल्यानंतर घरी जाताना अडचण येणार नाही.
-विजय अमृतराज, माजी टेनिसपटू