सुवर्णपदक विजेत्या रॉबी मैतेयीची भावना
डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले होते, डोळे डबडबलेले, त्यामध्ये तिरंगा दिसत होता, राष्ट्रगीताची धून लागली आणि काही सुचेनासे होत होते.. मी नेमके काय करायला हवे ते कळत नव्हते. राष्ट्रगीत संपल्यावर भारत माता की जय, हा जयघोष झाला आणि मी भरून पावलो. मी देशासाठी काहीतरी करू शकलो, हा आनंद स्वर्गीय असाच आहे, असे मत ७५ किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावलेला रॉबी मैतेयी सांगत होता.
हे पदक मला सहज मिळालेले नाही, त्यामागे गेल्या काही वर्षांची मेहनत आणि मित्रांच्या मदतीचे हात आहेत. आशियाई स्पर्धेमध्ये मला सुवर्णपदक मिळाले होते. त्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला होता, पण ही स्पर्धा जागतिक दर्जाची होती. त्यामुळे कडवी झुंज मिळणार, हे माहिती होते. पण मी प्रतिस्पध्र्याचा विचार केला नाही, तर स्वत:च्या शरीररावर अथक मेहनत घेतली, याचेच हे फळ आहे, असे रॉबी म्हणाला.
गेल्या काही वर्षांमध्ये रॉबीकडे नोकरी नव्हती, पण तीन महिन्यांपूर्वी मात्र मला नौदलात नोकरी मिळाली. पण त्यानंतर लगेचच मी या स्पर्धेच्या तयारीला लागलो. या पदकामुळे आता कदाचित नोकरीमध्ये बढतीही मिळू शकेल. पण यापूर्वी ज्या वाईट परिस्थितीमध्ये संयम ठेवला त्याचेच हे फळ आहे, असे रॉबी म्हणाला.
आता सुवर्णपदक जिंकल्यावर काय करणार असे विचारल्यावर रॉबी म्हणाला की, ‘‘मी आता थोडे दिवस आराम करेन. गेले काही दिवस मी व्यायामशाळेमध्ये जुंपलो होतो. त्यामुळे आता शरीराला विश्रांतीची गरज आहे. त्यानंतर भारताला पुन्हा एक पदक मिळवण्याच्या तयारीला लागणार आहे.’’