आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे केलेले निलंबन ही तात्पुरती समस्या असल्याचे उद्गार भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी काढले. हा थोडय़ा कालावधीचा प्रश्न असून, येत्या काही महिन्यांत त्यावर तोडगा काढला जाईल, असे ते पुढे म्हणाले. याप्रश्नी चर्चा, वादविवाद करण्यापेक्षा थोडा काळ प्रतीक्षा करणे योग्य ठरेल, असेही त्यांनी सांगितले. कुह स्पोर्ट्सतर्फे आयोजित प्रतिभाशोध कार्यक्रमात सुमारीवाला बोलत होते. भारताची प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा या कार्यक्रमाला उपस्थित होती.
भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या निवडणुकीबाबत विचारले असता सुमारीवाला म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय महासंघाशी आम्ही नेहमीच संलग्न आहोत. आमच्या संघटनेच्या निवडणुका एप्रिलमध्ये घेण्यात आल्या. या प्रकरणी कोणताही वाद नाही. अ‍ॅथलिट्सना त्रास देण्यासाठी हितसंबंध असलेल्या व्यक्तींनी महासंघाच्या निवडणुकीचा वाद उकरून काढला.’’
दरम्यान, क्रीडा मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांच्या झालेल्या निवडणुका बरखास्त केल्या होत्या. या पदांसाठी ६० दिवसांत अथवा २८ फेब्रुवारीपर्यंत नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश राष्ट्रीय क्रीडा महासंघाला दिले होते. याव्यतिरिक्त भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने आपल्या संविधानात आवश्यक सुधारणा कराव्यात, अन्यथा त्यांची संलग्नता रद्द करण्यात येईल, असे क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले.
एप्रिल महिन्यात भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या झालेल्या निवडणुका क्रीडा धोरणाला अनुसरून नसल्याने क्रीडा मंत्रालयाने या निवडणुका अवैध ठरवल्या होत्या. क्रीडा मंत्रालयाने या निवडणुका अवैध ठरवल्या असल्या तरी आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या संघटनेने या निवडणुका नियमांनुसार होणार असल्याचा निर्वाळा दिला होता.