ऑलिम्पिक स्पर्धेत पदकतालिकेत भारत एकेरी संख्येवरच स्थिरावलेला असला तरी ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचा विचार होत असल्याचे अधोरेखित झाले आहे. २०२४ ऑलिम्पिक स्पर्धा अहमदाबाद येथे आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त आहे. या पाश्र्वभूमीवर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बॅच  रविवारी भारत भेटीवर येत आहेत.
भारत भेटीदरम्यान बॅच सोमवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, त्या वेळी अहमदाबादला ऑलिम्पिक आयोजनाच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
२०१३ मध्ये आयओसीची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच बॅच भारतात येत आहेत. या दौऱ्यात बॅच भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारिणी समितीचीही भेट घेणार आहेत. या कार्यक्रमानंतर बॅच प्रसारमाध्यमांशी बातचीत करणार आहेत आणि त्यानंतर ते ल्युसाने येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीसाठी रवाना होणार आहेत.
दरम्यान, अहमदाबादला ऑलिम्पिक आयोजन मिळण्याच्या चर्चेला भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि क्रीडा मंत्रालय यांनी दुजोरा दिलेला नाही. यासंदर्भात दोन्ही संघटनांचे पदाधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत. २०२४ ऑलिम्पिकसाठी बोस्टन, हॅम्बुर्ग आणि रोम शहरांनी निवेदन सादर केले आहे.
भारत क्रीडा क्षेत्रात अव्वल देशांमध्ये गणला जावा अशी बॅच यांची इच्छा असल्याचे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी सांगितले. बॅच यांच्या भेटीमुळे ऑलिम्पिक निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.