भारतातर्फे २०२४च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या संयोजनाचा प्रस्ताव पाठविला जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बॅच हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नवी दिल्लीत सोमवारी चर्चा करणार आहेत.
बॅच यांनी २०१३मध्ये आयओसीचे अध्यक्षपद स्वीकारले, त्यानंतर त्यांची ही पहिलीच भारत भेट आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजता ते मोदी यांची भेट घेणार आहेत. त्याआधी सकाळी १० वाजता ते भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री सर्बानंद सोनवाल यांनी बॅच यांच्या सन्मानार्थ खास भोजनाचे आयोजन केले आहे. एक दिवसाच्या भेटीत ते पत्रकारांशी वार्तालाप करणार आहेत, तर सोमवारी रात्री ते ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.
भारतातर्फे २०२४च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनाचा प्रस्ताव दाखल केला जाण्याची शक्यता आहे. २०२४च्या स्पर्धेसाठी भारत उत्सुक होता, मात्र ही स्पर्धा पॅरिस येथे आयोजित करण्याबाबत बॅच यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्कॉईस ओलॉद यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली आहे.