पूर्व अफगाणिस्तानमध्ये व्हॉलीबॉल स्पर्धेच्या वेळी झालेल्या आत्मघातकी स्फोटाच्या घटनेचा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) निषेध केला आहे. या हल्ल्यात किमान ४५ जण ठार झाले आहेत. आंतर-जिल्हा स्पर्धेच्या वेळी खूप प्रेक्षकांनी गर्दी केली होती. गर्दीच्या मधोमध ही घटना घडल्यामुळे खूप लोक जखमीही झाले. आयओसीने या घटनेचा निषेध केला आहे. समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी म्हटले आहे, ‘‘ही घटना अत्यंत निंदनीय आहे. काही निरपराध लोक मारले गेले तर अनेकजण जखमी झाले आहेत. हा हल्ला म्हणजे क्रीडा क्षेत्रावरच झालेला हल्ला आहे. जखमी लोक लवकर बरे होतील अशी मला आशा आहे. ऑलिम्पिक चळवळीतील लोकांनी या घटनेचा निषेध करीत क्रीडा क्षेत्राद्वारे लोकांमधील समता, बंधुता टिकून राहील यासाठी प्रयत्न करावेत.’’
ही घटना ज्या प्रदेशात घडली, त्या याह्य़ाखाईल परिसरात तालिबानी व हक्कानी यांच्यासारख्या दहशतवादी संघटना कार्यरत आहेत.