कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात केवळ ४९ धावांत गारद झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला गुजरात लायन्स विरुद्धच्या सामन्यातही लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. बेंगळुरूने दिलेलं १३५ धावांचं कमकुवत आव्हान गुजरातने सात विकेट्स राखून गाठलं. बेंगळुरूच्या निराशजनक कामगिरीमुळे आता स्पर्धेतून पहिल्याच फेरीत बाद होण्याची टांगती तलवार कोहलीच्या संघावर आहे. गुजरात लायन्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला २० षटकांच्या अखेरीस फक्त १३४ धावांपर्यंतच मजल मारता आली. बेंगळुरूचा संपूर्ण संघ १३४ धावांवरच गारद झाला.

गुजरातकडून यावेळी आरोन फिंचने ३४ चेंडूत नाबाद ७२ धावांची खेळी साकारली. यात फिंचने सहा उत्तुंग षटकार ठोकले. तर कर्णधार सुरेश रैना ३४ धावांवर नाबाद राहिला. तत्पूर्वी, सामन्याची नाणेफेक जिंकून गुजरात लायन्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कोहली आणि गेल यांनी पहिली तीन षटके सावध पद्धतीने खेळून काढली होती. सामन्याच्या चौथ्या षटकात कोहली(१०) थम्पीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पुढच्याच षटकात अँड्र्यू टायने एकाच षटकात दोन विकेट्स घेऊन बेंगळुरूचे कंबरडे मोडले. टायने घातक ख्रिस गेल आणि हेडला माघारी धाडले. केदार जाधवने मैदानात येताच  तीन चौकार ठोकून वातावरणात रंगत आणली खरी पण जडेजाने त्याचा काटा काढला. केदार जाधव (३१) क्लीनबोल्ड झाला. पुढे डीव्हिलियर्सकडून संघाच्या आशा होत्या, पण मनदीप सिंगसोबत ताळमेळ चुकला आणि तो धावचीत झाला. बेंगळुरूचा निम्मा संघ अवघ्या ६० धावांमध्येच माघारी परतला होता. पवन नेगीने १९ चेंडूत ३२ धावांची खेळी साकारली खरी, पण दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्या आणि १३४ धावांमध्ये बेंगळुरूचा डाव संपुष्टात आला.