आयपीएलमधील अखेरच्या साखळी लढतीमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध चमत्कारिक विजयाने मुंबई इंडियन्सचे ‘प्ले-ऑफ’चे स्वप्न साकारले होते. बुधवारी फिरकीचे चक्रव्यूह त्यांना तारेल अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. दोन वेळा आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने ब्रेबॉर्न स्टेडियमवर गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ‘खेळ खल्लास’ केला. चेन्नईचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने अर्धशतकासह या विजयाचा अध्याय लिहिला. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी दुपारी राष्ट्रीय निवड समितीने महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी रैनाकडे सोपवली आहे. ती सार्थ ठरवणारी खेळी साकारताना रैनाने ३२ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५४ धावा केल्या. डेव्हिड हसीने (नाबाद ४०) त्याला तोलामोलाची साथ दिली. आता वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी होणाऱ्या ‘क्वॉलिफायर-२’च्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबची चेन्नई सुपर किंग्जशी गाठ पडणार आहे आणि या सामन्यातील विजेता रविवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर  कोलकाता नाइट रायडर्सशी अंतिम फेरीत भिडणार आहे.  मुंबईने चेन्नईपुढे १७४ धावांचे आव्हान ठेवले होते. दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने हे आव्हान सात विकेट्स राखत पूर्ण केले.
ड्वेन स्मिथ (२४) आणि फॅफ डय़ू प्लेसिस (३५) यांनी ६० धावांची शानदार सलामी नोंदवली खरी, हरभजन सिंगने सातव्या षटकात या दोघांना तंबूची वाट दाखवत चेन्नईच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. स्मिथ ६ धावांवर असताना प्रवीण कुमारने त्याच्याबाबत पायचीतचे अपील केले होत. परंतु पंचांनी ते फेटाळून लावले. त्यानंतर ब्रेंडन मॅक्क्युलमने (१४) निराशा केली. पण रैनाने धीराने खेळपट्टीवर तग धरून हसीसोबत चौथ्या विकेटसाठी नाबाद ८९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचून संघाला जिंकून दिले. हरभजन आणि प्रग्यान ओझा यांनी मुंबईच्या फलंदाजांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण रैना आणि हसीने आत्मविश्वासाने खेळत त्यांची तमा बाळगली नाही. ओझाच्या १६व्या षटकात हसीने तीन षटकार खेचले.
त्याआधी, सलामीवीर फलंदाज लेंडल सिमॉन्सने ४४ चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकारांनिशी साकारलेल्या ६७ धावांच्या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सला निर्धारित षटकांमध्ये ८ बाद १७३ धावांचे समाधानकारक आव्हान उभारता आले.
 मुंबईची सुरुवात छान झाली. २९ वर्षीय सिमॉन्सने अनुभवी माइक हसीच्या (३९) साथीने संघाला ७६ धावांची दमदार सलामी नोंदवून दिली. त्यानंतर कोरे अँडरसन, रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड यांनीही आपल्या परीने योगदान दिले. पण २ बाद १४३ अशी मजल मारणाऱ्या मुंबई इंडियन्सची अखेरच्या चार षटकांमध्ये त्रेधातिरपिट उडाली आणि त्यांचे सहा फलंदाज तंबूत परतले. चेन्नईच्या मोहित शर्माने आपल्या ४ षटकांमध्ये ४२ धावा दिल्या, पण तीन बळी मात्र मिळवले. आशिष नेहरा आणि फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ८ बाद १७३ (लेंडल सिमॉन्स ६७, माइक हसी ३९; मोहित शर्मा ३/४२, रवींद्र जडेजा २/३१)
चेन्नई सुपर किंग्ज : १८.४ षटकांत ३ बाद १७६ (डेव्हिड हसी ४०, सुरेश रैना ५४, हरभजन सिंग २/२७).
सामनावीर : सुरेश रैना