कर्णधार रोहित शर्माने साकारलेली अफलातून खेळी आणि मिचेल मॅक्लेघन, जोस बटलर या दोघांनी केलेल्या उपयुक्त खेळींच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सवर सहा विकेट्सनी मात करत विजयाची बोहनी केली.
रोहित आणि पार्थिव पटेल जोडीने ५५ धावांची सलामी दिली. पार्थिव (२३) तर हार्दिक पंडय़ा (९) धावांवर परतल्याने धावगतीचे दडपण वाढले. मॅक्लेघानने ८ चेंडूत ३ षटकारांसह २० धावांची आक्रमक खेळी केली. मॅक्लेघन बाद झाल्यावर रोहितने जोस बटलरच्या साथीने चौथ्या विकेटसाठी २८ चेंडूत ६६ धावांची भागीदारी केली. २२ चेंडूंत ४१ धावांची वेगवान खेळी करून बटलर बाद झाला. मात्र रोहितने ५४ चेंडूंत १० चौकार आणि २ षटकारांसह ८४ धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रोहितलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
तत्पूर्वी, गौतम गंभीर, मनीष पांडे आणि आंद्रे रसेल या त्रिकुटाच्या दिमाखदार खेळींच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्स संघाने १८७ धावांची मजल मारली. भरवशाचा रॉबिन उथप्पा केवळ ८ धावा काढून तंबूत परतला. मिचेल मॅक्लेघनने त्याला बाद केले. मात्र त्यानंतर गंभीर-पांडे जोडीने दहाच्या सरासरीने दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. हरभजन सिंगने पांडेला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. त्याने २९ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारासह ५२ धावांची खेळी केली. गंभीरने आंद्रे रसेलच्या साथीने तिसऱ्या विकेटसह ४३ धावांची भागीदारी केली. मॅक्लेघानने रसेलची वेगवान खेळी संपुष्टात आणली. त्याने १७ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांसह ३६ धावांची खेळी साकारली. पाठोपाठ गंभीरही तंबूत परतला. गंभीरने ४ चौकार आणि एका षटकारासह ५२ चेंडूंत ६४ धावांची खेळी केली. युसफ पठाण, कॉलिन मुन्रो आणि सूर्यकुमार यादव या तिघांना मिळून १२ चेंडूंत १७ धावाच करता आल्या.

संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ५ बाद १८७ (गौतम गंभीर ६४, मनीष पांडे ५२, आंद्रे रसेल ३६; मिचेल मॅक्लेघन २/२५) पराभूत विरुद्ध मुंबई इंडियन्स : १९.१ षटकांत ४ बाद १८८ (रोहित शर्मा नाबाद ८४, जोस बटलर ४१; पीयुष चावला १/२९)
सामनावीर : रोहित शर्मा.