जोस बटलरची ३७ चेंडूतील ७७ धावांची तुफान खेळी, तर जबरदस्त फॉर्मात असलेल्या नितशी राणाच्या नाबाद ६२ धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचे १९९ धावांचे आव्हान सामन्याच्या १६ व्या षटकातच गाठले. बटलर, राणासोबतच सलामीवीर पार्थिव पटेलनेही १८ चेंडूत ३७ धावा ठोकून महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर हार्दिक पंड्यानेही यावेळी ४ चेंडूत नाबाद १५ धावा ठोकल्या. किंग्ज इलेव्हनचे आव्हानाला सामोरे जाण्यासाठी यावेळी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याला मैदानात उतरावेच लागले नाही. मुंबईने किंग्ज इलेव्हन पंबाजवर ८ विकेट्सने दिमाखदार विजय साजरा केला.

हशीम अमलाची नाबाद शतकी खेळी आणि मॅक्सवेलने १८ चेंडूत ठोकलेल्या ४० धावांच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १९९ धावांचे आव्हान ठेवले होते. गेल्या चार सामन्यांमध्ये विजयाची चव चाखलेल्या मुंबईच्या फलंदाजांनी मोठ्या आत्मविश्वासाने डावाला सुरूवात करत अगदी पहिल्याच षटकापासून फटकेबाजीला सुरूवात केली. पहिल्या सहा षटकांमध्येच मुंबईने ८० धावांचा आकडा पार केला होता. पार्थिव पटेल(३७) बाद झाल्यानंतर रोहित शर्माऐवजी नितीश राणा फलंदाजीसाठी मैदानात आला. राणाने आपल्या कामगिरीतील सातत्य ठेवत पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी साकारली. राणाने अवघ्या ३४ चेंडूत नाबाद ६२ धावा ठोकल्या. यात ८ खणखणीत षटकारांचा समावेश होता.

मुंबई इंडियन्सने सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हशीम अमला आणि शॉन मार्शने ४६ धावांची भागीदारी रचली. मॅक्लेघनने मैदानात जम बसवत असलेल्या मिचेल मॅक्लेघनचा काटा काढला. त्यानंतर वृद्धीमान साहा देखील धावांसाठी झगडताना दिसला. कुणाल पंड्याने साहाला(११) क्लीनबोल्ड केले. हशीम अमलाने मात्र मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा समाचार घेत संघाच्या धावसंख्येची गती कायम ठेवली. सलामीला फलंदाजीला उतरलेला हशीम अमला वीस षटकांच्या अखेरीसही नाबाद राहिला. अमलाने ६० चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी साकारली. यात ६ खणखणीत षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता.

दुसऱ्याबाजूने कर्णधार ग्लेन मॅक्सवेलला देखील चांगला सुर गवसला होता. मॅक्सवेलने केवळ १८ चेंडूत ३ षटकार आणि चार चौकारांच्या सहाय्याने ४० धावा ठोकल्या. मुंबई इंडियन्सकडून यावेळी लसिथ मलिंगा याने सर्वाधिक धावा दिल्या. मलिंगाच्या चार षटकांमध्ये किंग्ज इलेव्हनच्या फलंदाजांनी ५८ धावा वसुल केल्या, तर मॅक्लेघनने चार षटकांमध्ये ४६ धावा दिल्या. मात्र, त्याने दोन विकेट देखील घेतल्या.

सामनावीर- जोस बटलर