आयपीएलमधील गुजरात लायन्स संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी भारतीय संघाचा माजी क्षेत्ररक्षणवीर मोहम्मद कैफ याची नियुक्ती करण्यात आली आहे. संघमालक इंटेक्स टेक्नॉलॉजिसचे संचालक केशव बंसल यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, कैफकडे अनुभव आहे आणि त्याला खेळाची योग्य नस माहिती आहे. कैफचा अनुभव पाहाता आम्हाला त्याच्याकडे मोठी जबाबदारी द्यायची होती. कैफच्या मार्गदर्शनाखाली संघाला खूप फायदा होईल असा विश्वास मला आहे.

 

ट्वेन्टी-२० प्रकारात अष्टपैलू कामगिरीसाठी ओळख असलेला सुरेश रैना गुजरात लायन्स संघाचा कर्णधार आहे. रैनाच्या नेतृत्त्वाखाली संघाने आयपीएलच्या मागील पर्वात उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. संघाच्या सहाय्यक प्रशिक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर कैफ म्हणाला की, प्रशिक्षकपदाच्या भूमिकेसाठी मी खूप उत्सुक आहे. रैना, जडेजा आणि ब्रावोसारख्या हरहुन्नरी खेळाडूंसोबत वेळ व्यतित करण्याची नामी संधी मिळाली आहे.

येत्या ५ एप्रिल रोजी आयपीएल स्पर्धेचा पहिला सामना हैदराबादमध्ये खेळविण्यात येणार आहे. तर २१ मे रोजी याच स्टेडियमवर स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्यात येईल. आयपीएलची यंदाची स्पर्धा तब्बल ४७ दिवस चालणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार स्पर्धेतील प्रत्येक संघ १४ सामने खेळणार आहे. यातील प्रत्येक संघ ७ सामने होम ग्राऊंडवर होणार आहेत. याशिवाय, यंदा पहिल्यांदा इंदुर स्टेडियमवर आयपीएलचा सामना खेळविण्यात येणार आहे.