जागतिक क्रिकेटमध्ये धोनीच्या चपळ यष्टीरक्षणाची उदाहरणं दिली जातात. अचूक यष्टीरक्षणाने धोनीने यष्टीरक्षणाचा स्तर उंचावला. धोनीच्या अशाच अफलातून स्टम्पिंगचा आणखी एक नजराणा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात अनुभवायला मिळाला. धोनीने केलेल्या स्टम्पिंगने सर्वांना जागेवर उभं राहण्यास भाग पाडलं. सर्वांनी टाळ्यांचा प्रतिसाद देत धोनीचं कौतुक केलं.

झालं असं की, पुण्याचा फिरकीपटू सुंदरच्या फिरकीवर गौतम गंभीरने फाईन लेगच्या दिशेने फटका लगावून एक धाव घेण्यासाठी नरेनला इशारा केला. सुनील नरेन धावला देखील पण फाईन लेगवर फिल्डिंगला असलेल्या शार्दुल ठाकूरने यष्टीरक्षक धोनीच्या दिशेने थ्रो केला. धोनीने अतिशय अचूक पद्धतीने बॉलला दिशा दिली आणि बॉल स्टम्प्सवर आदळला. पंचांनी रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्ये नरेन धावचीत झाल्याचे निष्पन्न झाले आणि स्टेडियमवर एकच जल्लोष सुरू झाला.

स्टम्प्सकडे आपलं लक्ष नसतानाही अचूक वेध घेण्याच्या धोनीच्या कौशल्याचा भन्नाट नमुना अवघ्या क्रिकेट जगताला पाहायला मिळाला. या स्टम्पिंगमधून धोनी केवळ नेतृत्त्व गुणांसाठीच नाही, तर यष्टीरक्षणाच्या बाबतही अव्वल आहे हे अधोरेखित झालं.
पुण्याने या सामन्यात प्रथम फलंदाजी करून २० षटकांमध्ये १८२ धावा केल्या. पण जबरदस्त फॉर्मात असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने हे आव्हान पूर्ण केले आणि सामना सात विकेट्सने जिंकला. रॉबीन उथप्पा आणि गौतम गंभीर याने १५६ धावांची भागीदारी रचून कोलकात्याला विजय प्राप्त करून दिला.