भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) यंदा इंडियन प्रिमिअर लीग(आयपीएल) स्पर्धेसाठीच्या लिलाव प्रक्रियेत यंदा अफगाणिस्तानच्या पाच क्रिकेटपटूंचाही समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तानच्या रशीद खानला लॉटरीच लागली. बंगळुरूत झालेल्या लिलावात रशीद खान याच्यावर पदापर्णातच चार कोटींची बोली लागली आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली होती. आजच्या लिलावात अफगाणिस्तानच्या पाच खेळाडूंवर सर्वांचे लक्ष होते. मोहम्मद नबीवर सर्वात आधी बोली लावण्यात आली. नबीवर सन रायझर्स हैदराबादने ३० लाखांची बोली लावून आपल्या ताफ्यात दाखल केले. मोहम्मद नबीने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आयसीसीच्या वनडे क्रमवारीत नबीला सातवे स्थान देखील मिळाल होते. गेल्या दोन वर्षात ट्वेन्टी-२० मध्ये दोनशेहून अधिक धावा केल्या आहेत, तर ६० हून अधिक विकेट्स घेतल्या. नबीच्या गोलंदाजीची सरासरी देखील अफलातून राहिली होती. वेस्ट इंडिजचा सुनली नरेन, पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी यांच्यानंतर मोहम्मद नबीचा सरासरीच्या बाबतीत तिसरा क्रमांक लागतो.

 

मोहम्मद नबीनंतर रशीद खानने आयपीएलच्या बोलीत सर्वांना धक्काच दिला. १८ वर्षीय लेग स्पीनर रशीद खान याच्यावर सन रायझर्स हैदराबादने ४ कोटींची बोली लावली. फिरकी गोलंदाजीसह रशीद खान फलंदाजीत देखील चांगली कामगिरी करू शकतो. रशीदने अफगाणिस्तानकडून २१ ट्वेन्टी-२० सामने खेळले असून त्याच्या नावावर ३१ विकेट्स जमा आहेत. रशीद खान याची आयपीएल लिलावासाठी पायाभूत किंमत ५० लाख इतकी ठेवण्यात आली होती. मुंबई इंडियन्सने सुरूवातीला रशीद खान याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्याची इच्छा दाखवली. मात्र, सरतेशेवटी सन रायझर्सने ४ कोटींची बोली लावत बाजी मारली.