आयपीएलमुळे क्रिकेटपटूंनाही अच्छे दिने आले आहेत. आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत क्रिकेपटूंवर लागणारी बोली नेहमीच चर्चेचा विषय असते. यंदाच्या लिलाव प्रक्रियेत तामिळनाडू आणि राजस्थानच्या दोन गोलंदाज मालामाल झाले आहे.  टी नटराजन आणि अनिकेत चौधरी या दोघांवर यंदा कोट्यवधींची बोली लागल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

आयपीएलच्या दहाव्या हंगामासाठी सोमवारी लिलाव प्रक्रीया पार पडली. या लिलाव प्रक्रियेत डावखु-या गोलदांजांना ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसून आले. टी नजराजन या वेगवान गोलंदाजाला त्याच्या पायाभूत किंमतीच्या ३०० टक्के जास्त पैसे मोजून किंग्ज इलेव्हन पंजाबने घेतले आहे. नटराजनला किंग्ज इलेव्हनने ३ कोटी रुपयांमध्ये घेतले आहे. यंदाच्या पर्वात टी नटराजन हा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. तर अनिकेत चौधरीला आरसीबीने २ कोटींमध्ये घेतले आहे.

तामिळनाडूमधील चिन्नप्पमपट्टीजवळील सालेममधील गरीब घरात जन्मलेल्या नटराजनसाठी आता चांगले दिवल आहेत. २५ वर्षीय नटराजन वेगात गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. २० वर्षापर्यंत नटराजन टेनिस बॉलने गोलंदाजी करायचा हेदेखील विशेष. यॉर्कर टाकण्यात पटाईत असलेला नटराजन आता आयपीएलमधील ‘डार्क हॉर्स’ ठरणार आहे. नटराजनने २०१५ मध्ये पश्चिम बंगालविरुद्ध रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २०१६/१७ या कालावधीत तामिळनाडूसाठी सर्वाधिक विकेट घेणा-या गोलंदाजांच्या यादीत तो तिस-या स्थानी आहे. त्याने २४ विकेट घेतल्या होत्या. नटराजनने कर्नाटकविरुद्ध केलेल्या गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. मात्र तामिळनाडू प्रिमिअर लीगमधील त्याच्या कामगिरीमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. या प्रिमिअर लीगमध्ये त्याने सात सामन्यांमध्ये १० विकेट घेतल्या होत्या. यात त्याचा इकॉनॉमी रेट ७.३३ होता. तर आंतरराज्य टी २० सामन्यांमध्ये त्याने ४ विकेट घेतल्या होत्या.

नटराजनसोबत २७ वर्षीय अनिकेत चौधरी आयपीएलमध्ये कोट्यधीश झाला आहे. राजस्थानचा हा डावखुरा गोलंदाज मिशेल स्टार्कमुळे चर्चेत आला होता. मिशेल स्टार्कचा सराव करण्यासाठी टीम इंडियाने सरावादरम्यान अनिकेत चौधरीला बोलावले होते. न्यूझीलंड दौ-यात ट्रेंट बॉल्टच्या स्विंगचा सराव करण्यासाठी अनिकेत चौधरीच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांनी सराव केला होता. बांगलादेशविरुद्ध भारत अ संघातून खेळणा-या अनिकेतने ४ विकेट घेतल्या. सध्या अनिकेत भारतीय संघासोबत पुण्यात आहे. अनिकेतला २०१३ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने घेतले होते. मात्र त्यावेळी तो एकही सामना खेळला नाही. यंदाच्या पर्वासाठी अनिकेतची पायाभूत किंमत १० लाख रुपये ऐवढी होती. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्याला तब्बल २० पट जास्त म्हणजे २ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे.