आयपीएलचे आतापर्यंत दहा हंगाम झाले. या दहा वर्षांत मुंबईने तीनदा जेतेपद पटकावले. या तीनपैकी कोणते जेतेपद जास्त संस्मरणीय होते, हे मला सांगता येणार नाही. पण यावेळी  अंतिम फेरीचा सामना हा थरारक झाला. आयपीएलचे हे तिसरे जेतेपद माझ्यासाठी अविस्मरणीय असेल, असे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले.

मुंबईमधून खेळायला आवडेल

पुढील वर्षी आयपीएलमध्ये खेळाडूंचा भव्य लिलाव होणार आहे. पण मी जिथे लहानाचा मोठा झालो त्याच मुंबईकडून खेळायला मला आवडेल. मुंबईमध्ये मी क्रिकेट खेळायला शिकलो. मुंबई हीच माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे मला यापुढे मुंबईकडूनच आयपीएलमध्ये खेळायला आवडेल, असे रोहित म्हणाला.

जयवर्धने आणि पॉन्टिंग यांची शैली भिन्न

सध्याचे प्रशिक्षक महेला जयवर्धने आणि आम्ही २०१५ साली जेव्हा जेतेपद जिंकलो तेव्हाचे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग या दोघांचीही शैली भिन्न आहे. पण या दोघांकडे अमाप अनुभव आहे. दोघांनीही आपल्या देशाचे कर्णधारपद भूषवले होते. या दोघांकडून बऱ्याच गोष्टी मला शिकता आल्या. माझ्यामते हीच गोष्ट आयपीएलबाबत सर्वात चांगली आहे, असे रोहितने सांगितले.

खेळाडूंनी विश्वास सार्थ ठरवला

गेल्यावर्षी आमच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही. पण यावर्षी आम्ही चांगली कामगिरी करू, असा मला विश्वास होता, असे रोहित म्हणाला.