गुजरात लायन्सविरुद्ध २१ धावांनी विजय प्राप्त केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्याचा सहकारी फलंदाज ख्रिस गेल याची मुलाखत घेतली. ख्रिस गेलने या सामन्यात ७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती. गेल सामनावीराचा मानकरी देखील ठरला. यासोबतच गेलने ट्वेन्टी-२० विश्वात नव्या विक्रमालाही गवसणी घातली. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारा गेल पहिला फलंदाज ठरला. सामना जिंकल्यानंतर या विक्रमवीर गेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या आणखी एका विक्रमवीर खेळाडूने मुलाखत घेतली. कोहलीने गेल सोबतच्या मुलाखतीत धम्माल उडवून दिली.

”माझ्यासोबत ओपनिंग करायची संधी तुला मिळाली तर त्याबद्दल कसं वाटतंय?” असा प्रश्न विचारून कोहलीने गेलची थट्टा केली. त्यावर गेलनेही कोहलीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव करत तो महान फलंदाज असल्याचे म्हटले.

”तुझ्यासोबत ओपनिंग करतानाचा अनुभव माझ्यासाठी खूप खास आहे. तू महान फलंदाज आहेस आणि तू खूप धावा देखील केल्या आहेस. नॉन स्ट्राईकवर उभं राहून तुझ्या फलंदाजीचा आनंद घेण्याचा अनुभव खूप भारी असतो. क्रिकेट करिअरमध्ये तू अनेक विक्रमांना गवसणी घातली आहेस आणि भविष्यातही तुझी कामगिरी याहूनही वाढती राहिल, अशा मनापासून शुभेच्छा देतो”, असे गेल म्हणाला. मग कोहलीनेही गेलचे कौतुक करताना त्याने ट्वेन्टी-२० विश्वात गाठलेल्या दहा हजार धावांच्या टप्प्याबाबतही त्याचे अभिनंदन केले.