सांघिक कामगिरी उत्कृष्ट झाल्याने मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी असल्याचे मत संघाचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने व्यक्त केले. स्पर्धेत झालेली सकारात्मक सुरूवात कायम ठेवण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. संघाकडून अशीच कामगिरी होत राहिली तर नक्कीच अंतिम फेरीपर्यंत पोहोचू, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

”सुरूवातीच्या आठ सामन्यांमधील सहा सामन्यांमध्ये विजय प्राप्त करणे म्हणजे संघासाठी खूप चांगली गोष्ट आहे. सुरूवात तर चांगली झालीय, पण यापुढेही अशीच कामगिरी राहिली तर नक्कीच फायदेशीर ठरेल.”, असे पार्थिव पटेल म्हणाला.

 

जोस बटलरसोबत फलंदाजी करण्याचा खूप आनंद असल्याचेही तो म्हणाला. ”मला खेळपट्टीवर जम बसवण्यासाठी सुरूवातीचा चार-पाच चेंडू खेळून काढावे लागत असले तरी जोस बटलरच्या बाबतीत तसे नसते. तो अगदी पहिल्या चेंडूपासूनही फटकेबाजी करू शकतो. त्यामुळे स्फोटक फलंदाजासोबत खेळताना खूप मजा येते.”, असे पार्थिवने सांगितले. याशिवाय, त्याने संघाच्या गोलंदाजांचेही कौतुक केले. खेळपट्टी फलंदाजीला पोषक असली तरी आमच्याकडे गोलंदाजीचा योग्य समतोल आहे. चार षटकं टाकू शकतील असे सहा गोलंदाजांचे पर्याय आमच्यासमोर उपलब्ध आहेत. तसेच फलंदाजीतही सहा पर्याय आहेत. अशाप्रकारचा समतोल आमच्यात असल्यानेच आम्ही गुणतालिकेत अव्वल स्थानी आहोत, असे पार्थिवने म्हटले.