किंग्ज इलेव्हन पंजाबचा उमदा ‘नायक’ ग्लेन मॅक्सवेलने मंगळवारी पुन्हा एकदा तळपत्या तलवारीसह रणांगणात पराक्रम दाखवला. सनराजयर्स हैदराबादच्या गोलंदाजीवर घणाघाती फटक्यांची बरसात करत मॅक्सवेलने पुन्हा एकदा सर्वाधिक धावा फटकावण्याची किमया साधली आणि संघाला १९३ धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या लक्ष्मीपती बालाजीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर हैदराबादचा संघ १२१ धावांमध्येच ढासळला आणि पंजाबने हैदराबादवर ७२ धावांनी मात करत आयपीएलच्या सातव्या हंगामात सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत अव्वल स्थान आणि मॅक्सवेलने ‘ऑरेंज कॅप’चा मान पटकावला आहे.
पंजाबच्या १९३ धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाने ठराविक फरकाने फलंदाज गमावले आणि पुन्हा एकदा पराभव त्यांच्या पदरी पडला. बालाजीने भेदक मारा करत हैदराबादच्या आव्हानातील हवाच काढून टाकली. बालाजी आणि पंजाबच्या गोलंदाजांच्या अचूक माऱ्यापुढे हैदराबादला १२१ धावांवर समाधान मानावे लागले. बालाजीने ४ षटकांमध्ये फक्त १३ धावा देत चार फलंदाजांना माघारी धाडले.
तत्पूर्वी, हैदराबादने नाणेफेक जिंकत पंजाबला फलंदाजीला पाचारण केले आणि स्पर्धेत पहिल्यांदाच पंजाबला अर्धशतकी सलामी मिळाली. चेतेश्वर पुजारा (३५) आणि वीरेंद्र सेहवाग (३०) यांनी हैदराबादच्या गोलंदाजांचा सुरुवातीपासून समाचार घेत संघाला चांगली सुरुवात करून दिली. सेहवाग बाद झाल्यावर आतापर्यंत संघाच्या विजयाचा नायक ठरलेला ग्लेन मॅक्सवेल मैदानात आला व पुन्हा एकदा त्यांने प्रतिस्पध्र्याच्या ठिकऱ्या उडवल्या. हैदराबादच्या गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवत त्याने फक्त ४३ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि तब्बल ९ षटकारांची आतिषबाजी करत या स्पर्धेत दुसऱ्यांदा ९५ धावा काढल्या, परंतु त्याचे शतक पुन्हा एकदा पाच धावांनी हुकले. यावेळी मॅक्सवेलला दोनदा जीवदान मिळाले. करण शर्माच्या १०व्या षटकात डेव्हिड वॉर्नरने मॅक्सवेलचा झेल सोडला, तर १५व्या षटकांत डॅरेन सॅमीने त्याचा झेल पकडला, पण तो ‘नो-बॉल’ होता. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने १९ धावांत तीन फलंदाज बाद केले.
संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ६ बाद १९३ (ग्लेन मॅक्सवेल ९५, चेतेश्वर पुजारा ३५; भुवनेश्वर कुमार ३/१९) विजयी वि. सनरायजर्स हैदराबाद : १९.२ षटकांत सर्व बाद १२१. (लोकेश राहुल २७; लक्ष्मीपती बालाजी ४/१३)
 सामनावीर : ग्लेन मॅक्सवेल