चेन्नई सुपर किंग्जचा संघ नावाजलेला असला तरी आम्हीही कोणापेक्षा कमी नाही, असाच संदेश किंग्ज इलेव्हन पंजाबने विजयी सलामी देत आयपीएलच्या चाहत्यांना दिला. चेन्नईने दमदार शतकी सलामीच्या जोरावर २०५ धावा फटकावल्या होत्या. पण ग्लेन मॅक्सवेलच्या तुफानी खेळीच्या जोरावर पंजाबने चेन्नईला सहा विकेट्सनी पराभूत केले.
चेन्नईच्या २०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने ५२ धावांमध्ये तीन फलंदाज गमावले होते. पण त्यानंतर मॅक्सवेलचे वादळ घोंघावले आणि त्यापुढे चेन्नईच्या गोलंदाजांना नतमस्तक व्हावे लागले. मॅक्सवेलने फक्त ४३ चेंडूंत तब्बल १५ चौकार आणि २ षटकार लगावत ९५ धावांची अप्रतिम खेळी साकारली आणि संघाला विजयाचे स्वप्न दाखवले. शतकाला पाच धावा हव्या असताना मॅक्सवेल बाद झाला तरी त्यानंतर डेव्हिड मिलरने सर्व सूत्रे हाती घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मिलरने तीन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ५४ धावांची खेळी साकारली.
तत्पूर्वी, चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांचा हा निर्णय सलामीवीरांनी चोख असल्याचे दाखवून दिले. ब्रेन्डन मॅक्क्युलम आणि ड्वेन स्मिथ यांनी तडाखेबंद फलंदाजी करत १२३ धावांची सलामी देत पंजाबच्या गोलंदाजांची पिसे काढली. मॅक्क्युलमने ४५ चेंडूंत ४ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ६७ धावांची खणखणीत खेळी साकारली, तर स्मिथने ४३ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६६ धावांनी तडफदार खेळी साकारली. या दोघांनी दिलेली शतकी सलामी आणि अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या हाणामारीच्या जोरावर चेन्नईने चार बाद २०५ अशी दणदणीत मजल मारली.

संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ४ बाद २०५ (ब्रेन्डन मॅक्क्युलम ६७, ड्वेन स्मिथ ६६; लक्ष्मीपती बालाजी २/४३) पराभूत वि. किंग्ज इलेव्हन पंजाब : १८.५ षटकांत ४ बाद २०६ (ग्लेन मॅक्सवेल ९५, डेव्हिड मिलर नाबाद ५४; आर. अश्विन २/४१).
सामनावीर : ग्लेन मॅक्सवेल.