सुरेश रैना सोमवारी अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर मुसळधार पावसाप्रमाणे बरसला. त्याच्या धुवाँदार अर्धशतकामुळेच चेन्नई सुपर किंग्जला दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध ९३ धावांनी दणदणीत विजय नोंदवता आला. या विजयानिशी चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या सातव्या मोसमातील आपले खाते उघडले आहे.
चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १७७ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्यानंतर दिल्लीचा डाव १५.४ षटकांत फक्त ८४ धावांत आटोपला. दिल्लीकडून जिम्मी निशामने २२ आणि दिनेश कार्तिकने २१ धावा काढल्या. त्या वगळता दिल्लीच्या अन्य फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. ऑफ-स्पिनर आर. अश्विनने फक्त ३ धावांत २ बळी घेतले, तर रवींद्र जडेजा आणि इश्वर पांडे यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याआधी, रैनाने क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडताना फक्त ४१ चेंडूंत ५६ धावांची खेळी साकारताना ५ चौकार आणि एक षटकार पेश केला. याचप्रमाणे त्याने ड्वेन स्मिथसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४६ चेंडूंत ५४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जला मोठय़ा धावसंख्येचा उत्तम पाया उभारता आला. मग उत्तरार्धात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या आवेशपूर्ण फलंदाजीचा प्रत्यय घडवताना १५ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या साहाय्याने ३२ धावा काढल्या. फॅफ डय़ू प्लेसिनने १७ चेंडूंत उपयुक्त २४ धावा काढल्या. दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या जयदेव उनाडकटने ३२ धावांत ३ बळी घेतले.
संक्षिप्त धावफ लक
चेन्नई सुपर किं ग्ज : २० षटकोंत ७ बाद १७७ (ड्वेन स्मिथ २९, सुरेश रैना ५६, महेंद्रसिंग ३२; जयदेव उनाडक ट ३/३२) विजयी वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : १५.४ षटकोंत सर्व बाद ८४ (जिम्मी निशाम २२, दिनेश कोर्तिक २१; आर. अश्विन २/३, रवींद्र जडेजा २/१८, इश्वर पांडे २/२३)
सामनावीर : सुरेश रैना.