मागील तीन सामन्यांमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला एक विजय मिळवता आला असला तरी या तिन्ही सामन्यांमध्ये संघाचा कर्णधार केव्हिन पीटरसनला दुखापतीमुळे एकही सामना खेळता आला नव्हता. पण पुढच्या सामन्यामध्ये खेळण्याची आशा  केव्हिन पीटरसन याने व्यक्त केली आहे.
‘‘मला माहिती नाही की संघाला माझी उणीव जाणवते आहे किंवा नाही. पण ही स्पर्धा फार मोठी आहे. मला अशी आशा आहे की, पुढील सामन्यामध्ये मी खेळू शकेन,’’ असे पीटरसन म्हणाला.
दिल्लीचा आगामी सामना सनरायजर्स हैदराबादबरोबर २५ एप्रिलला होणार आहे. या सामन्यासाठी पीटरसनने सराव करायला सुरुवात केली असून या सामन्यात तो खेळू शकेल, अशी आशा संघालाही आहे.
याबाबत पीटरसन म्हणाला की, ‘‘लंडनमध्ये मी स्पर्धेच्या सरावाला सुरुवात केली होती, पण त्या वेळी दुखापत झाली आणि तीन आठवडे मला खेळापासून लांब रहावे लागले. पण गेल्या दोन दिवसांपासून मी सराव सुरू केला आहे. पण स्पर्धेत उतरण्यासाठी ही आदर्श सुरुवात आहे, असे मला वाटत नाही.’’