कोणतेही स्टेडियम, कोणताही गोलंदाज यांची तमा न बाळगता सातत्याने धावा काढणारा विराट कोहली आणि आत्मविश्वास परतल्यामुळे आवेशाने फटकेबाजी करणारा युवराज सिंग यांच्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला गुरुवारी विजयी सलामी नोंदवता आली. ‘विजयाची ही घडी अशीच राहू दे’ या ध्येयाने  प्रेरित झालेल्या बंगळुरूच्या संघापुढे शनिवारी आव्हान असेल ते गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे. परंतु आयपीएलच्या सातव्या मोसमाला पराभवाने प्रारंभ करणाऱ्या मुंबई इंडियन्सला बंगळुरूचा सामना करणे कठीण जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
धडाकेबाज फलंदाजांचा भरणा असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या पहिल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सवर आठ विकेट राखून विजय मिळवला. आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धीम्या गतीने फलंदाजी केल्यामुळे युवीवर कडाडून टीका झाली होती. परंतु गुरुवारी त्याने नाबाद ५२ धावांची खेळी साकारली आणि कोहली (नाबाद ४९) सोबत ८४ धावांची भागीदारी रचली. स्फोटक फलंदाज ख्रिस गेल दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. परंतु त्याची उणीव बंगळुरूला भासली नाही.
प्रतिस्पर्धी संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), ए बी डी’व्हिलियर्स, ख्रिस गेल, युवराज सिंग, मिचेल स्टार्क, अ‍ॅल्बी मॉर्केल, वरुण आरोन, अशोक दिंडा, पार्थिव पटेल, मुथय्या मुरलीधरन, रवी रामपॉल, निक मॅडिन्सन, हर्शल पटेल, विजय झोल, अबू नचिम, सचिन राणा, शदाब जकाती, संदीप वॉरियर, तन्मय मिश्रा, योगेश ताकवले, युजवेंद्र चहल.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), लसिथ मलिंगा, किरॉन पोलार्ड, हरभजन सिंग, अंबाती रायुडू, मायकेल हसी, झहीर खान, प्रग्यान ओझा, कोरे अँडरसन, जोश हॅझलवूड, सी एम गौतम, आदित्य तरे, अपूर्व वानखेडे, र्मचट डी लँगे, क्रिश्मर सँटोकी, बेन डंक, पवन सुयल, सुशांत मराठे, जसप्रित बुमराह, श्रेयस गोपाळ, जलाज सक्सेना.