ट्वेन्टी-२० क्रिकेट स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाते. राजस्थान रॉयल्सने दिलेल्या १९१ धावांच्या डोंगराएवढय़ा लक्ष्याचा पाठलाग करताना ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलर यांनी अद्भुत फटकेबाजी करत किंग्ज इलेव्हन पंजाबला शानदार विजय मिळवून दिला. मॅक्सवेलने ४५ चेंडूत ८९ तर मिलरने १९ चेंडूत ५१ धावांची तुफानी खेळी केल्या. चेन्नईविरुद्ध २०० धावांचे लक्ष्य पेललेल्या पंजाबने या सामन्यातही प्रचंड लक्ष्य गाठताना चाहत्यांना चौकार-षटकारांची मेजवानी दिली.
प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबची सुरुवात खराब झाली. वीरेंद्र सेहवागला पुन्हा अपयश आले. धवल कुलकर्णीने त्याला २ धावांवर बाद केले. त्यानंतर वृद्धिमान साहाही २ धावांवरच बाद झाला. मात्र जबरदस्त फॉर्मात असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने तुफानी फटकेबाजी करत किंग्ज इलेव्हनचा विजय आवाक्यात आणला. प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेत मॅक्सवेलने तडाखेबंद फटकेबाजी केली. धवलने टाकलेल्या १२व्या षटकात त्याने १७ धावा वसूल केल्या. मॅक्सवेलला चेतेश्वर पुजाराची चांगली साथ मिळाली. वाढत्या धावगतीचे आव्हान समोर असल्यामुळे मोठा फटका खेळण्याच्या नादात मॅक्सवेल केन रिचर्डसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. मॅक्सवेलने ४५ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांसह ८९ धावांची अविश्वसनीय खेळी केली. मॅक्सवेल-पुजारा जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची वेगवान भागीदारी केली.
मॅक्सवेलनंतर मिलरने पुजारासह सुरेख खेळी करत पंजाबला विजय मिळवून दिला. मिलरने धवल कुलकर्णीच्या षटकांत ४ षटकारांसह २७ धावा वसूल करत सामन्याचे चित्रच पालटवले. पुजाराने नाबाद ४० धावांची खेळी केली. मिलरने ६ षटकारांसह १९ चेंडूत ५१ धावा केल्या.
तत्पूर्वी राजस्थान रॉयल्सने १९१ धावांचा डोंगर उभारला. मुंबईकर अजिंक्य रहाणे १३ धावांवर बाद झाला. अभिषेक नायर आणि शेन वॉटसन जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ३२ धावा जोडल्या. यानंतर वॉटसन आणि संजू सॅमसन जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. ५ चौकार आणि ३ षटकारांसह २९ चेंडूत ५० धावांची खेळी करून वॉटसन बाद झाला. सॅमसनने ३४ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली.  
संक्षिप्त धावफलक :
राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ५ बाद १९१ (संजू सॅमसन ५२, शेन वॉटसन ५०, अक्षर पटेल २/२१) पराभूत विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब : १८.४ षटकांत ३ बाद १९३ (ग्लेन मॅक्सवेल ८९, डेव्हिड मिलर नाबाद ५१, चेतेश्वर पुजारा नाबाद ४०, केन रिचर्डसन १/२५)
सामनावीर : ग्लेन मॅक्सवेल.