लक्ष्य सोपे असले तरी ते गाठण्याची वाट अवघड असू शकते, याचा प्रत्यय घेत राजस्थान रॉयल्सने सलामीच्या लढतीत सनरायजर्स हैदराबादवर ४ विकेट्सनी विजय मिळवला. सनराजयर्सच्या १३४ धावांचा पाठलाग करताना राजस्थानची ३ बाद ३१ अशी अवस्था झाली होती. मात्र अजिंक्य रहाणे आणि स्टुअर्ट बिन्नी जोडीने संयत भागीदारी रचत राजस्थानच्या विजयाचा पाया रचला. मुंबईकर अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी साकारत या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. मुंबईचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर डेल स्टेनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने ४ धावा केल्या. गेल्या हंगामात आपल्या फटकेबाजीने छाप उमटवणारा केरळचा संजू सॅमसन मोठा फटका खेळण्याच्या नादात ३ धावा करून तंबूत परतला. कर्णधार आणि अनुभवी शेन वॉटसनला इशांत शर्माने बाद करत राजस्थानला अडचणीत आणले. ३ बाद ३१ अशा स्थितीतून अजिंक्य रहाणे आणि स्टुअर्ट बिन्नी जोडीने संयमी भागीदारी करत राजस्थानच्या विजयाचा पाया रचला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ७७ धावांची  भागीदारी केली. रहाणेने ५३ चेंडूत ६ चौकारांसह ५६ धावांची खेळी केली. रहाणेपाठोपाठ ब्रॅड हॉजही बाद झाल्याने राजस्थानचा विजय लांबला. मात्र बिन्नीने ४८ धावांची नाबाद खेळी करत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, सनरायजर्स संघाने शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या भागीदारीच्या जोरावर सन्मानजनक धावसंख्या गाठली. मुंबईकर धवल कुलकर्णीने धडाकेबाज फलंदाज आरोन फिंचला झटपट माघारी धाडले. त्याला केवळ २ धावा करता आल्या. त्यानंतर शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी करत डाव सावरला. धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध हे दोन्ही फलंदाज स्थिरावले असे वाटत असतानाच रजत भाटियाने त्याला बाद केले. धवनने ३४ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह ३८ धावा केल्या. लगेचच भाटियाने वॉर्नरलाही तंबूचा रस्ता दाखवला. वॉर्नरने ३२ धावांची खेळी केली. ही भागीदारी फुटल्यानंतर सनरायजर्सच्या डावाची घसरण उडाली आणि त्यांना १३३ धावांचीत मजल मारता आली. राजस्थान रॉयल्सतर्फे धवल कुलकर्णी, रजत भाटिया आणि केन विल्यमसन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
सनरायजर्स हैदराबाद : २० षटकांत ६ बाद १३३ (शिखर धवन ३८, डेव्हिड वॉर्नर ३२; रजत भाटिया २/२२) पराभूत विरुद्ध राजस्थान रॉयल्स : १९.३ षटकांत ६ बाद १३५ (अजिंक्य रहाणे ५९, स्टुअर्ट बिन्नी नाबाद ४८; भुवनेश्वर कुमार २/२१)
सामनावीर : अजिंक्य रहाणे.