तंत्रशुद्ध फलंदाजीच्या कौशल्याने आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवणारा प्रतिभावान फलंदाज गौतम गंभीरने टी-२० विश्वात सहा हजार धावांचा टप्पा गाठला. शुक्रवारी दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या सामन्यात गंभीरने नाबाद ७१ धावांची खेळी साकारून सहा धावांचा टप्पा ओलांडला. गंभीरने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्त्व करताना अनेकदा कर्णधारी खेळी साकारून संघाला विजय प्राप्त करून दिला आहे. कोलकाताने आजवर दोन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. यंदाच्या पर्वातही कोलकाता दमदार फॉर्मात असून गंभीर, उथप्पाने प्रतिस्पर्धी संघाला सळो की पळो करून सोडले आहे.

 

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करत कोलकातासमोर विजयासाठी १६१ धावांचे आव्हान दिले होते. कोलकाताने हे आव्हान सात विकेट्स राखून गाठले. गंभीरची नाबाद ७१ धावांची खेळी, तर उथप्पाने ३३ चेंडूत ५९ धावांची खेळी साकारली.

गंभीरने आतापर्यंत २२९ टी-२० सामन्यांमध्ये ५१ अर्धशतकं ठोकली असून १२१.८१ च्या स्ट्राईक रेटने ६०३२ धावा केल्या आहेत. यात गंभीरने एकूण ७०९ चौकार आणि ८० षटकार ठोकले आहेत. टी-२० मध्ये ९३ धावांची सर्वाधिक खेळी गंभीरने साकारली आहे. याशिवाय, गंभीरने ५८ कसोटी सामन्यांमध्ये ४,१५४ धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये ८५.२५ च्या स्ट्राईक रेटने त्याच्या नावावर ५२३८ धावा जमा आहेत.