आयपीएलचा सोमवारी झालेला खेळाडूंचा लिलाव भारताच्या युवा खेळाडूंच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. यामध्ये हैदराबादच्या मोहम्मद सिराजचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. क्रिकेट कारकीर्दीत ५०० रुपयाच्या बक्षीसापासून ते सोमवारच्या २.६० कोटीच्या बोलीपर्यंतचा सिराजचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सिराजला सनरायजर्स हैदराबाद संघाने २ कोटी ६० लाख रुपये मोजून आपल्या चमूत दाखल करून घेतले. मिळालेल्या रकमेतून वडील मोहम्मद घाऊस आणि आई शबाना बेगम यांच्यासाठी सर्वप्रथम एक घर घेण्याचा निर्धार त्याने बोलून दाखवला.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर सिराजने भारत ‘अ’ आणि शेष भारत संघात स्थान पटकावले होते. हैदराबाद संघाने चमूत दाखल करून घेतल्यानंतर सिराज म्हणाला,‘आज मला क्रिकेटमधून कमावलेला पहिला पगार आठवला. काकांच्या नेतृत्त्वाखालील एका क्लब सामन्यात मी २५ षटकांत २० धावा देत ९ बळी टिपले. या कामगिरीवर काका इतके खुश झाले की त्यांनी बक्षीस म्हणून मला ५०० रुपये दिले. त्यावेळची भावना या घडीला शब्दात सांगू शकत नाही, परंतु आज माझ्यासाठी हैदराबाद संघाने २.६ कोटी रुपये मोजले, ते पाहून मी निशब्द झालो.’

मध्यम वर्गातील कुटुंबात जन्मलेल्या सिराजला आई-वडीलांनी त्याच्यासाठी केलेल्या त्यागाचे ऋण फेडायचे आहे. ‘मेरे वालिद साबने (वडील) बोहोत मेहनत की है! (माझ्या वडीलांनी बरेच काबाडकष्ट केले आहेत.). गेली कित्तेक वर्ष ते रिक्षा चालवत आहेत आणि अथक परिश्रम घेत त्यांनी कुटुंबावर कधी आर्थिक संकट ओढावू दिले नाही. गोलंदाजीसाठीची बुट महाग आहेत आणि त्यांनी मला नेहमी सर्वोत्तम बुट आणून दिले. मला त्यांच्यासाठी एका चांगल्या ठिकाणी घर विकत घ्यायचे आहे,’ असे सिराज म्हणाला.

तो पुढे म्हणाला की,‘माझ्या कुटुंबियांनी अनेक वाईट दिवस पाहिले आहेत. आज माझा मोठा भाऊ एका आयटी कपंनीत सॉफ्टवेअर अभियंता आहे. मला अभ्यासात फार रुची नव्हती आणि आई सतत भावाचे उदाहरण देऊन माझी कानउघडणी करायची. पण आज तिला खूप आनंद झाला आहे.’