इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) या देशातील सर्वात लोकप्रिय ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठीच्या आगामी दहाव्या पर्वासाठीच्या खेळाडूंचा लिलाव सोमवारी बंगळुरूत पार पडला. अपेक्षेप्रमाणे यावेळी इंग्लंडच्या अष्टपैलू बेन स्टोक्सने लिलावात बाजी मारली. स्टोक्सला १४ कोटी ५० लाखांचा सर्वाधिक भाव मिळाला. पुणे सुपर जाएंट्स संघाचे गोयंका यांनी बेन स्टोक्सवर सर्वाधिक बोली लावली. त्यापाठोपाठ इंग्लंडच्याच टायमल मिल्स या डावखुऱया वेगवान गोलंदाजाला १२ कोटींचा भाव मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने टायमल मिल्सला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. मिल्सने भारतीय संघाविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या ट्नेन्टी-२० मालिकेत अतिशय हुशारीने गोलंदाजी केली होती.

वाचा: आयपीएल लिलावात विकले गेलेले आणि न विकले गेलेले खेळाडू कोणते?

 

भारतीय खेळाडूंमध्ये यावेळी युवा क्रिकेटपटू कर्ण शर्मा याच्यावर ३ कोटी २० लाखांची बोली लागली. तर अनिकेत चौधरी यालाही दोन कोटींचा भाव मिळाला. मागील पर्वात साडेआठ कोटींची लॉटरी लागलेल्या पवन नेगीला यावेळी केवळ १ कोटींचा भाव मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पवन नेगीला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. भारतीय युवा क्रिकेटपटूंना चांगला भाव मिळालेला पाहायला मिळाले असताना दुसऱया बाजूला अनुभवी क्रिकेटपटूंना मात्र संघ मालकांनी भाव दिला नाही. तब्बल दोन कोटींची पायभूत किंमत निश्चित करण्यात आलेला इशांत शर्मा शेवटपर्यंत ‘अनसोल्ड’ राहिला. यासोबत चेतेश्वर पुजारा, आर.पी.सिंग, इरफान पठाण यांचीही निवड होऊ शकली नाही. मनोज तिवारी याच्या बोलीवरही दोन वेळा कोणत्याच संघाने रस दाखवला नाही. मात्र अखेरच्या सत्रात तिवारीला पुण्याच्या संघाने ५० लाखांची बोली लावून आपल्या ताफ्यात सामावून घेतले.  इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनला दोन कोटींच्या बोलीसह वीरेंद्र सेहवागने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघात दाखल करून घेतले. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टवर २ कोटींची बोली लावून कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला ताफ्यात दाखल करून घेतले.

वाचा: कोण आहे कोट्यधीश टायमल मिल्स?

बीसीसीआयने यंदा लिलाव प्रक्रियेत अफगाणिस्तानच्या पाच क्रिकेटपटूंचाही समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तानच्या रशीद खानला लॉटरीच लागली. बंगळुरूत झालेल्या लिलावात रशीद खान याच्यावर पदापर्णातच चार कोटींची बोली लागली. मोहम्मद नबीवर सर्वात आधी बोली लावण्यात आली. नबीवर सन रायझर्स हैदराबादने ३० लाखांची बोली लावून आपल्या ताफ्यात दाखल केले. तर १८ वर्षीय लेग स्पीनर रशीद खान याच्यावर सन रायझर्स हैदराबादने ४ कोटींची बोली लावली.