एखाद्याचे नशीब केव्हा फळफळेल हे सांगता येत नाही. त्याचे वडिल चेन्नई रेल्वे स्थानकावर हमालाचे काम करायचे, तर आई रस्त्यावर अन्नपदार्थाचे छोटेखानी दुकान चालवायची. कुटुंबात पाच भावंड होती. पण त्याला क्रिकेटची फार आवड, क्रिकेट वेडाच तो. पण हलाखीच्या परिस्थितीतही त्याने आपली ही आवड जोपासली. गाठीशी पैसा नसला तरी अथक मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने आता स्वप्नवत मजल मारली आहे. सुरुवातीला टेनिस क्रिकेटमधून त्याने नाव कमावले. त्यानंतर तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये त्याने दिंडीगुल ड्रॅगन्स संघाकडून खेळताना आपल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर सर्वानाच चकित केले. आणि आता आयपीएलच्या दहाव्या हंगामाच्या लिलावात तब्बल तीन कोटी रुपये मोजत किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. ही गोष्ट आहे थांगरासू नटराजनची.

तामिळनाडूमधील लीगमध्ये नटराजनने नेत्रदीपक कामगिरी केली असली तरी राष्ट्रीय स्तरावर त्याला जास्त कुणी ओळखत नव्हते. डावखुरा वेगवान गोलंदाजी करणाऱ्या नटराजनसाठी लिलावात दहा लाख रुपयांची किमान किंमत ठेवण्यात आली होती आणि किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला तीन कोटी रुपयांची बोली लावत संघात सामील केले.

‘आयपीएलमध्ये भाग घेण्याचे स्वप्न कधी साकार होईल, अशी कधी कल्पनाही केली नव्हती. मात्र तामिळनाडू लीगमध्ये मिळालेल्या संधीचा मी जिद्दीच्या जोरावर लाभ घेतला. तिथे खेळताना माझ्यावर सुरुवातीला दडपण आले होते. मात्र सहकाऱ्यांनी  दिलेल्या प्रोत्साहनामुळेच माझी कारकीर्द बहरली. आता माझ्यावर मोठी जबाबदारी आली आहे. ऑस्ट्रेलियाचा मिचेल जॉन्सन हा माझा आदर्श खेळाडू आहे. त्याच्यासारखी प्रभावी गोलंदाजी करण्याचा माझा मानस आहे,’ असे नटराजनने सांगितले.

नटराजनला २०१५-१६ मध्ये रणजी स्पर्धेत तामिळनाडू संघाकडून भाग घेण्याचीही संधी मिळाली होती.