आयपीएलशी व्यावसायिक हितसंबंध असणारे सुनील गावस्कर, रवी शास्त्री आणि सौरव गांगुलीसहित अनेक माजी खेळाडू आणि प्रशासकांची यादी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला सादर केली. स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी संदर्भातील आपली याचिका सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवली आहे.
बीसीसीआयच्या या यादीत अनिल कुंबळे, के. श्रीकांत, व्यंकटेश प्रसाद आणि लालचंद रजपूत यांचा समावेश आहे. टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मंगळवारी म्हटले होते की, जर आयपीएल किंवा चॅम्पियन्स लीगशी तुमचे व्यावसायिक हितसंबंध असतील, तर तुम्ही प्रशासकीय जबाबदारी सांभाळू नये.
वरिष्ठ वकील सी. ए. सुंदरम यांनी ही यादी सर्वोच्च न्यायालयाला सादर करताना म्हटले की, यापैकी कुंबळे, श्रीकांत आयपीएलमधील संघांना मार्गदर्शन करतात आणि गावस्कर, गांगुली हे काही खेळाडू समालोचन करतात.