न्यायाधीश मुकुल मुद्गल यांच्या नेतृत्वाखालील समितीने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील(आयपीएल) सट्टेबाजी आणि स्पॉट-फिक्सिंगबाबतचा अंतिम अहवाल सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे.
मुद्गल समितीने या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम मसुदा निश्चित केल्यानंतर एका बंद लिफाफ्यातून हा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. या खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची पुढील सुनावणी १० नोव्हेंबरला होणार असून, या निर्णयाची बीसीसीआयला प्रतीक्षा आहे.
मुद्गल यांच्यासह अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एल. नागेश्वर राव, वकील नीलय दत्ता, अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे उपमहासंचालक बी. बी. मिश्रा व माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांचा या समितीमध्ये समावेश होता.
या अहवालात मुख्यत्वे एन.श्रीनिवासन, चेन्नई सुपर किंगचा टीम प्रिन्सिपल गुरुनाथ मयप्पनसह फिक्सिंग प्रकरणाचे इतर १२ आरोपी खेळाडूंच्या भूमिकेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आल्याची शक्यता आहे.
आयपीएलच्या सहाव्या हंगामात एस. श्रीशांत, अजित चंडिला व अंकित चव्हाण यांना स्पॉट-फिक्सिंग केल्याच्या आरोपांवरून अटक केली होती. याव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंगचा टीम प्रिन्सिपल गुरुनाथ मयप्पनसह बॉलीवूड अभिनेता विंदू दारासिंग सट्टेबाजीच्या आरोपांवरून तुरुंगात आहेत.