प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामाला दोन महिन्यांचा अवधी असताना तेलुगू टायटन्स संघाने इराणचा कबड्डीपटू हादी ओश्टोरॅकला २१ लाख १० हजार अशी सर्वात जास्त किमतीची विक्रमी बोली लावून करारबद्ध केले आहे. हादीसाठी दीड लाख रुपये मूळ रक्कम निश्चित करण्यात आली होती, परंतु लिलावामध्ये त्याला १४ पट अधिक बोली लागली आणि तो प्रो-कबड्डी लीगच्या इतिहासातील सर्वात जास्त किमतीचा खेळाडू ठरला आहे.
ओश्टोरॅकचा इराणचचा सहकारी मेराज शेखलासुद्धा तेलुगू टायटन्सने २० लाख १० हजार रुपयांची बोली लावून संघात सामील केले आहे. गेल्या वर्षी प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या हंगामात पाटणा पायरेट्सने १२ लाख ८० हजार रुपयांच्या बोलीसह राकेश कुमारला संघात स्थान दिले होते.
भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी २७ आंतरराष्ट्रीय खेळाडू लिलावासाठी उपलब्ध करण्यात आले होते.