शाहबाझ नदीमच्या (५३ धावांत ४ बळी) फिरकीपुढे गुजरातची तारांबळ उडाली. त्यामुळे ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या इराणी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या तिसऱ्या दिवसअखेर गुजरातची दुसऱ्या डावात ८ बाद २२७ अशी अवस्था झाली आहे. प्रियांक पांचाळ आणि चिराग गांधी यांची अर्धशतके हे गुजरातच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. गुजरातकडे आता ३५९ धावांची एकंदर आघाडी जमा असून, त्यांना चारशेच्या आत रोखण्याचा शेष भारताचा इरादा आहे.

तिसऱ्या दिवशी शेष भारताचा पहिला डाव २२६ धावांवर आटोपला. चिंतन गाजाने ६० धावांत ४ बळी घेत यात सिंहाचा वाटा उचलला. त्यानंतर गुजरातला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. पांचाळ (७३) आणि पार्थिव पटेल (३२) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यानंतर पहिल्या डावातील शतकवीर चिरागने (नाबाद ५५) गुजरातचा डाव सावरला आहे.

संक्षिप्त धावफलक

  • गुजरात (पहिला डाव) : ३५८
  • शेष भारत (पहिला डाव) : ७५ षटकांत सर्व बाद २२६ (चेतेश्वर पुजारा ८६; चिंतन गाजा ४/६०)
  • गुजरात (दुसरा डाव) : ८ बाद २२७ (प्रियांक पांचाळ ७३, चिराग गांधी ५५; शाहबाझ नदीम ४/५३)