मुंबई आणि शेष भारत यांच्यातील लढत आजपासून

ब्रेबॉर्न स्टेडियमवर रविवारपासून सुरू होणाऱ्या रणजी विजेत्या मुंबई आणि शेष भारत यांच्यातील इराणी चषकाच्या सामन्यात उदयोन्मुख खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी निवड समितीचे लक्ष वेधण्याची संधी मिळणार आहे.

सध्या जागतिक क्रिकेटला वेध लागले आहेत, ते काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे. मात्र त्याआधी प्रथम श्रेणी प्रकारातील या महत्त्वाच्या सामन्याकडे संदीप पाटीलच्या नेतृत्वाखालील पाच निवड समिती सदस्य गांभीर्याने पाहणार आहेत. कारण एप्रिल-मे महिन्यात इंडियन प्रीमियर लीग आटोपल्यानंतर पुढील हंगाम संपेपर्यंत भारताला १५ कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे ह सामना तसा महत्त्वाचा असणार आहे.

गेल्याच आठवडय़ात मुंबईने सौराष्ट्रला डावाने पराभव करून विक्रमी ४१व्यांदा रणजी करंडक जिंकला. यष्टिरक्षक-फलंदाज आदित्य तरेच्या नेतृत्वाखाली मुंबईचा समतोल संघ आता शेष भारताशी झुंजायला सज्ज झाला आहे.

शेष भारताचे नेतृत्व मध्य प्रदेशचा यष्टिरक्षक नमन ओझा करतो आहे. मूळ संघात बरिंदर सरण आणि नथ्थू सिंगचा समावेश होता. मात्र या दोघांनाही दुखापती झाल्यामुळे अंकित रजपूत आणि अनुरित सिंग यांना संघात स्थान मिळाले आहे, अशी माहिती प्रशिक्षक आशिष कपूर यांनी दिली. आंध्र प्रदेशचा के. एस. भरत विदर्भाच्या फैझ फझलसोबत डावाला प्रारंभ करील. शेष भारताची फलंदाजीची फळी फारशी प्रभावी नसून ओझा, कर्नाटकचा करुण नायर आणि सौराष्ट्रचा शेल्डन जॅक्सन या अनुभवी खेळाडूंवर त्यांची प्रमुख मदार आहे.

शेष भारतच्या वेगवान माऱ्याची धुरा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट सांभाळेल. त्याला साथ मिळेल ती आसामच्या कृष्णा दासची. त्याने १० सामन्यांत ५० बळी घेतले आहेत. झारखंडचा शहबाझ नदीम, हरयाणाचा जयदेव यादव व अक्षय वाखरे यांच्यावर शेष भारताच्या फिरकीची जबाबदारी असेल.

दुसरीकडे मुंबईच्या फलंदाजीच्या फळीत तरे (५६९) प्रभावी कामगिरी करीत आहे. त्याने यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक ४८ बळीसुद्धा घेतले आहेत. याशिवाय श्रेयस अय्यरची बॅट तेजाने तळपते आहे. त्याने यंदाच्या हंगामात ७८च्या सरासरीने १३२१ धावा केल्या आहेत. तर सलामीवीर अखिल हेरवाडकरच्या खात्यावर ५६९ धावा जमा आहेत. गोलंदाजीत मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूर फॉर्मात आहे. धवल कुलकर्णी आणि बलविंदर सिंग संधू यांची त्याला साथ मिळू शकेल.

संघ

मुंबई : आदित्य तरे (कर्णधार), अभिषेक नायर, धवल कुलकर्णी, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, अखिल हेरवाडकर, सिद्धेश लाड, सुफियान शेख, निखिल पाटील (ज्यु.), इक्बाल अब्दुल्ला, शार्दुल ठाकूर, बलविंदर सिंग संधू (ज्यु.), बद्री आलम, भाविन ठक्कर, विशाल दाभोळकर, जय बिस्ता.

शेष भारत : के. एस. भरत, फैझ फझल, करुण नायर, शेल्डन जॅक्सन, नमन ओझा (कर्णधार), स्टुअर्ट बिन्नी, शहबाझ नदीम, जयंत यादव, जयदेव उनाडकट, कृष्णा दास, सुदीप चटर्जी, इयान देव सिंग, अक्षय वाखरे, अंकित रजपूत, अनुरित सिंग.

वेळ : सकाळी ९.३० पासून.