ब्रॅडीच्या एकमेव गोलच्या बळावर विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीत

रॉबी ब्रॅडीने केलेल्या एकमेव गोलच्या बळावर आर्यलड प्रजासत्ताक संघाने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत इटलीला नमवत बाद फेरीत धडक मारली. उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान पक्के केलेल्या इटलीविरुद्ध जिंकणे आर्यलडला बाद फेरीत आगेकूच करण्यासाठी अनिवार्य होते. गोलशून्य बरोबरीकडे झुकलेल्या सामन्यात शेवटच्या मिनिटांमध्ये गोल करत आर्यलडने थरारक विजय साकारला.

बाद फेरीसाठी विजय क्रमप्राप्त असल्याने मार्टिन ओ’नील यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या आर्यलडने इटलीचा बचाव भेदण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. मात्र ते अपुरे ठरले. शेवटच्या मिनिटांमध्ये खेळाचा दर्जा उंचावत गोल करण्यासाठी आर्यलडचा संघ प्रसिद्ध आहे. याचाच प्रत्यय घडवत ब्रॅडीने ८५व्या मिनिटाला गोल केला आणि आर्यलडच्या चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले.

‘‘अशा क्षणांसाठी स्वप्ने पाहिली जातात. आम्हाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित प्रत्येक चाहत्याचा हा विजय आहे. जगभरात पसरलेल्या आमच्या चाहत्यांच्या पाठिंब्याच्या बळावर हा विजय मिळवू शकलो. माझ्यासह आर्यलड संघासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे. सांघिक शक्तीचे हा विजय प्रतीक आहे,’’ असे ब्रॅडीने सांगितले.

बेल्जियमविरुद्धच्या लढतीतील संघात प्रशिक्षक ओ’नील यांनी चार बदल केले. १९९४च्या विश्वचषकानंतर आर्यलडला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लढतीत इटलीविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. इटलीने याआधीच बाद फेरीतील स्थान पक्के केले असल्याने त्यांनी संघात आठ बदल केले. संपूर्ण संघाचा चेहरामोहराच बदलल्याने इटलीचा संघ विस्कळीत होता. मात्र त्याचवेळी प्रचंड पाठिंबा असलेल्या आर्यलडच्या संघाने जिद्दीने शिस्तबद्ध खेळ करत बाजी मारली.

या सामन्यासाठी स्टेडियमवरील आच्छादन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्टेडियममधील खेळपट्टीची स्थिती दव तसेच अन्य घटकांमुळे आणखी बिघडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. खेळपट्टी वावरण्यासाठी चांगली नसतानाही जेफ हेंड्रिकने डाव्या पायाद्वारे २० मीटरवरून गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो गोलपोस्टच्या बाहेरच्या बाजूने गेला. आर्यलडचे प्रतिनिधित्त्व करताना शेवटच्या २१ लढतींमध्ये एकदाही गोल करू न शकलेल्या मर्फीने गोलकोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अपयशी ठरला. असंख्य वेळा पेनल्टी कॉर्नरसंदर्भातील पंचांचे निर्णय आपल्या बाजूने न देण्यात आल्याने आर्यलडच्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. अँजेलो ओगबोनाने मर्फीशी केलेली धक्काबुक्कीची रोमानियाचे सामनाधिकारी आणि त्यांच्या सहयोगींनी नोंदच घेतली नाही. इटलीतर्फे सिरो इममोबाइलने गोल करण्यासाठी प्रयत्न केला.

मॅटिआ डी सिग्लोने दिलेल्या क्रॉसवर सिमोन झाझाने गोल केला मात्र गोलपोस्टच्या अंशभर वरुन गेला. ८५व्या मिनिटाला ब्रॅडीने गोल करत आर्यलडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Untitled-13