आयसीसीकडून दंडात्मक कारवाईचा बडगा
भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा व पाकिस्तानचा फलंदाज कमरान अकमल यांच्यात मंगळवारी बंगळुरूच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यादरम्यान भडकलेले वाक्युद्ध दोघांनाही महागात पडले आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) इशांत आणि अकमल या दोघांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.
शर्माच्या एका चेंडूवर अकमल हा झेलबाद झाला होता. मात्र पंचांनी तो नोबॉल ठरविला होता. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर अकमल थोडक्यात वाचला होता. त्यानंतर अकमल व शर्मा यांच्यात शाब्दिक चकमक झडली. अखेर पंचांनी मध्यस्थी करीत दोन्ही खेळाडूंना शांत केले. परंतु आयसीसीच्या आचारसंहितेच्या २.१.८ नियमाचा भंग केल्याप्रकरणी अकमल याच्या मानधनच्या पाच टक्के तर शर्माच्या मानधनाच्या १५ टक्के रक्कम दंड करण्यात आली आहे.
सामनाधिकारी रोशन महानामा यांनी सामन्याचे चित्रण पाहून इशांत शर्मानेच हा वाद निर्माण केल्याचा निष्कर्ष काढला. त्यामुळे त्याच्या अधिक रकमेची कारवाई करण्यात आली आहे.
‘‘बंगळुरू सामन्यादरम्यान झालेले भांडण किरकोळ स्वरूपाचे असून, त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे,’’ असे भारत व पाकिस्तान या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सामन्यानंतर सांगितले.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी म्हणाला, ‘‘या दोन्ही खेळाडूंमध्ये गैरसमजुतीने भांडण झाले. शर्माने व्यक्त केलेल्या बोलण्याचा अकमलने गैरसमजुतीने चुकीचा अर्थ लावल्यामुळे हा प्रकार घडला. शर्माने शिवीगाळ केलेली नाही. मात्र यापुढे असे प्रकार घडणार नाही याची मी खबरदारी घेईन. ’’
पाकिस्तानचा कर्णधार महम्मद हाफीझ म्हणाला, ‘‘आम्ही भारतात स्पर्धात्मक क्रिकेट खेळायला आलो आहोत. त्यामुळे असे प्रकार घडणे अपरिहार्य आहे. परंतु शर्मा व अकमल यांनी आपले भांडण मैदानावरच मिटविले आहे.’’