माजी गोलंदाज वेंकटेश प्रसादचे खडे बोल
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेमध्ये इशांत शर्मा जेवढा भेदक गोलंदाजीसाठी गाजला तेवढाच गैरवर्तणुकीसाठीही. श्रीलंकेच्या फलंदाजांना धारेवर धरत असताना त्याने त्यांच्या खेळाडूंनाही चांगलेच धारेवर धरले. पण एवढी वर्षे क्रिकेट खेळूनही इशांतला त्याच्या जबाबदारीची जाणीव नसल्याची टीका भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज वेंकटेश प्रसादने केली आहे.
‘‘एवढी वर्षे खेळूनही इशांत असे का करतो, हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. तो भारताला वेगवान गोलंदाजीचे उत्तम सारथ्य करतो. त्याने अन्य गोलंदाजांना आत्मविश्वास द्यायला हवा,’’ असे प्रसाद म्हणाला.
भारताकडून दोनशेपेक्षा अधिक बळी घेणारा इशांत हा चौथा गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर ७६ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ३१.२५ च्या सरासरीने १०६ विकेट्स घेतले आहेत.
‘‘ गेली बरीच वर्षे इशांत भारतीय संघात आहे. त्याच्याकडे असलेला अनुभव पाहता त्याने बिनधास्तपणे गोलंदाजी करायला हवी. जेव्हा तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असतो तेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने खेळायला हवे,’’ असे प्रसाद म्हणाला.