इंडियन सुपर लीगमध्ये खेळभावनेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) खेळाडू आणि प्रशिक्षकांवर कडक कारवाई करत सर्वानाच एकप्रकारे इशारा दिला आहे. एफसी गोवाविरुद्ध गुरुवारी झालेल्या सामन्यात खेळाडूंशी बाचाबाची केल्याप्रकरणी अ‍ॅटलेटिको डी कोलकाताचे मुख्य प्रशिक्षक अँटोनियो लोपेझ हबास यांच्यावर चार सामन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तर गोव्याचा रॉबर्ट पायरेस आणि कोलकाताचा फिकरू लेमेस्सा या खेळाडूंवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. हबास यांनी दुसऱ्यांदा या नियमांचे उल्लंघन केले आहे.
या बंदीव्यतिरिक्त एआयएफएफच्या शिस्तपालन समितीने आक्रमक वर्तणूक आणि खेळभावनेचा भंग केल्याप्रकरणी या तिघांना पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोलकाताचे गोलरक्षण प्रशिक्षक प्रदीपकुमार भक्तवेर यांना एक सामन्याकरिता निलंबित आणि ३० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. एआयएफएफच्या शिस्तपालन समितीच्या या निर्णयाविरोधात दाद मागण्याची संधी खेळाडूंना पुढील चार दिवसांत मागता येणार आहे.
दिल्लीचा चेन्नईवर विजय
नवी दिल्ली : घरच्या मैदानावर सुरेख कामगिरी करत दिल्ली डायनामोसने चेन्नईन एफसीचा ४-१ असा धुव्वा उडवला. दिल्लीकडून विम रेमेकर्स, मॅड्स जंकेर, ब्रुनो एरियस आणि गुस्ताव्हो दोस सांतोस यांनी गोल केले. चेन्नईन संघाकडून इलानो ब्लमेरने एकमेव गोल केला.