टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज झाली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाची येत्या ४ जूनला पाकिस्तान विरुद्ध पहिली लढत होणार आहे. भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की या लढतीला विशेष महत्त्व प्राप्त होतं. सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंवरही तितकाच दबाव देखील असतो. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने बुधवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोहलीला पाकिस्तान विरुद्धच्या लढतीबाबत विचारण्यात आले. त्यावर कोहलीने पाकिस्तानविरुद्धची लढत इतर संघांविरुद्धच्या लढतीसारखीच असणार असल्याचं म्हटलं.

”भारत-पाकिस्तान सामना चाहत्यांसाठी नक्कीच उत्कंष्ठावर्धक असतो. पण आमच्यासाठी तो केवळ एक क्रिकेटचा सामना असतो.”, असं कोहली म्हणाला. कोहलीने स्पर्धेत संघाच्या रणनीतीबाबतही वक्तव्य केलं. स्पर्धेत सामन्याच्या अगदी पहिल्या चेंडूपासून आम्हाला अव्वल खेळ करावा लागणार आहे. मागील चॅम्पियन्स ट्रॉफीत दमदार ओपनिंग हा आमचा सर्वात मजबूत घटक राहिला होता, असे कोहलीने सांगितले.
विराट कोहलीत यावेळी प्रचंड आत्मविश्वास पाहायला मिळाला. बचावात्मक भूमिकेतून मी कधीच खेळत नाही, मी फक्त जिंकण्यासाठीच खेळतो. स्पर्धेतील एकही सामना न गमावता विजेतेपद कायम ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, असं कोहली म्हणाला.

आयसीसी गुणतालिकेतील पहिले आठ संघ या स्पर्धेत खेळत असल्याने स्पर्धेतील आव्हान नक्कीच तगडं आहे. सर्व संघ आमच्यासाठी समान समान आहेत. केवळ एका संघासाठी आम्ही भावनिक होऊन खेळ करणं चालणार नाही. स्पर्धा जिंकणं हा आमचा मुख्य उद्देश आहे, असंही कोहली पुढे म्हणाला.