बरगडय़ांना झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सन पुढील चार कसोटी सामन्यांना मुकणार आहे. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत दुसऱ्या दिवशी पॅटिन्सन दुखापत बळावल्यामुळे तंबूत परतला. डॉक्टरांच्या परवानगीनंतर त्याने फलंदाजी केली. परंतु दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्याने तो दुसऱ्या डावातही गोलंदाजी करू शकला नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी मोठा कालावधी आवश्यक असल्याने आफ्रिकेविरुद्धची पर्थ येथे होणारी तिसरी कसोटी आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पॅटिन्सनला खेळता येणार नाही.