उद्योजकता, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या जपानने थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत मलेशियाला चीतपट करत इतिहास घडवला. १९४८-४९ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत मलेशिया, इंडोनेशिया आणि चीन या तीन देशांनाच जेतेपद पटकावता आले आहे. मात्र या मातब्बरांची सद्दी मोडत जपानने मलेशियावर ३-२ अशी करून नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मलेशियाच्या ली चोंग वेईने जपानच्या केनिची टागोवर २१-१२, २१-१६ असा सहज विजय मिळवला. अचंबित करणारे स्मॅशेस हे ली चोंग वुईच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले. दुसऱ्या लढतीत जपानच्या केनिची हायाकावा आणि हिरोयुकी इन्डो जोडीने मलेशियाच्या बून हेआंग तान आणि थिइन हाऊ हून जोडीवर १२-२१, २१-१७, २१-१९ अशी मात करत बरोबरी साधली. या स्पर्धेत लक्ष्यवेधी ठरलेल्या युवा केंटो मोमोटाने वेई फेंग चोंगला २१-१५, २१-१७ असे नमवत जपानला २-१ आघाडी मिळवून दिली.
दुहेरीच्या दुसऱ्या लढतीत मलेशियाच्या व्ही. शेम गोह आणि वी किआंग तान जोडीने जपानच्या केइगो सोनोडा-ताकेशी कामुरा जोडीचा २१-१९, २१-१७, २१-१२ असा पराभव केला. या विजयासह मलेशियाने २-२ अशी बरोबरी साधली. चित्तथरारक रंगलेल्या अंतिम आणि निर्णायक लढतीत जपानच्या ताकुमा युइडाने मलेशियाच्या डॅरेन लिअूवर २१-१२, १८-२१, २१-१७ असा विजय मिळवत जपानला ऐतिहासिक यश मिळवून दिले.
दिल्ली चॅट
पुरेपूर बॅडमिंटन
थॉमस चषक म्हणजे बॅडमिंटन विश्वाचा विश्वचषक. थॉमस चषकाची अंतिम लढत संपण्याआधीच विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी आवराआवरीला सुरुवात केली. मात्र बॅडमिंटनमधील सर्वोत्तम स्पर्धेत झटपट गोष्टी गुंडाळणे जपान-मलेशियाच्या खेळाडूंना मान्य नसावे. पाचव्या लढतीत, तिसऱ्या गेमपर्यंत मुकाबला गेल्याने आवराआवरी करणाऱ्यांना पुरेपूर बॅडमिंटनचा आस्वाद घ्यावा लागला.
सेल्फीची लाट
आयुष्यातले संस्मरमीय क्षण टिपण्यासाठी कॅमेऱ्याचा आधार घ्यावा लागतो. अत्याधुनिक स्मार्टफोन्समुळे व्यावसायिक छायाचित्रकार नसतानाही उत्तम छायाचित्र काढता येऊ लागली आहेत. या प्रवाहातील नवा फंडा म्हणजे सेल्फी. पदक जिंकलेल्या संघांच्या बहुतांशी खेळाडूंनी पदकासह सेल्फीचे छायाचित्र ट्विटर, फेसबुकवर शेअर केले. स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या लाडक्या खेळाडूंसमेवत सेल्फी टिपण्याची संधी अनेकांनी टिपली.
पाहुण्यांची गर्दी
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत शिक्षण, नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने जपान आणि मलेशियाचे नागरिक स्थायिक झाले आहेत. कर्मभूमीत मायदेशाला समर्थन देण्यासाठी सामना सुरू होण्याच्या नियोजित वेळेआधीच त्यांचे चाहते पोहचले होते. जपानच्या समर्थकांनी शरीराच्या विविध अवयवांवर जपानी झेंडय़ाचा टॅटू गोंदवला होता.